१ मे महाराष्ट्र व कामगार दिनाच्या पाश्र्वभूमीवर मनसेच्या वतीने येथील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात १ ते ९ मे या कालावधीत स्वस्त व घाऊक किमतीत नागरिकांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी विलास पाटील, महापौर अॅड. यतिन वाघ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अॅड. उत्तम ढिकले, आ. नितीन भोसले, सचिन ठाकरे, तुकाराम दिघोळे आदी उपस्थित राहणार आहेत. या धान्य महोत्सवात नाशिक जिल्ह्य़ातील विविध शेतमालाची थेट विक्री करण्यात येईल. यात आंबा, भाजीपाला यांसह इतर शेतमाल ग्राहकांना अत्यंत स्वस्त व घाऊक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा धान्य महोत्सव ना नफा ना तोटा या तत्त्वावर आयोजित केला आहे. एक क्विंटलपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यास आणि जे ग्राहक तीन किलोमीटरच्या आत राहत असतील त्यांना मनसेतर्फे धान्य घरपोच देण्यात येणार आहे. महोत्सवात गहू कमीतकमी ३० ते ५० किलोमध्ये उपलब्ध असेल. महोत्सवात केवळ धान्य विक्री करण्यात येणार नसून सर्व प्रकारच्या धान्याची माहिती व प्रबोधन करण्यात येणार आहे. महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित धान्य मिळणार असल्याची माहिती आ. वसंत गिते व अतुल चांडक यांनी दिली. अधिकाधिक नाशिककरांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आ. गिते यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा