शहरांमधील तलावांची देखभाल करण्यात महापालिका प्रशासनांना अपयश आल्याचे दिसत असताना कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकांच्या सीमारेषेवरील निळजे ग्रामपंचायतीने मात्र गावातील प्राचीन तळ्याचे संवर्धन करून तलाव सुशोभीकरणाचा वस्तुपाठच घालून दिला आहे. शासनाशी संघर्ष करून कल्याण-डोंबिवली महापालिकेतून स्वतंत्र झालेल्या २७ गावांपैकी निळजे एक प्रमुख ग्रामपंचायत आहे. गावातील प्राचीन तलाव हे पूर्वीपासूनच तिथे नियमित येणाऱ्या परदेशी पक्ष्यांमुळे पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण आहे.कोकण रेल्वे मार्गावरील स्थानक झाल्यानंतर डोंबिवलीपासून पाच किलोमीटर अंतरावर काहीशा आडबाजूला असणाऱ्या या गावाचा कायापालट होऊ लागला. आता तर गावात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. मात्र महानगरीय संस्कृतीचे असे चारही बाजूंनी आक्रमण होत असूनही या गावाने कसोशीने आपले गावपण जपले आहे. त्यातूनच चार वर्षांपूर्वी जमिनीच्या खरेदी-विक्रीतून मिळालेल्या महसुली लाभांशाचा वापर करून ग्रामपंचायतीने तलावाचे सुशोभीकरण केले. मूळच्या तब्बल १६ एकर विस्तीर्ण जागेतील या तलावास आता चारही बाजूंनी दगडी कंपाऊंड घातले आहे. तलावाभोवती फिरण्यास पायवाट करून घेण्यात आली आहे. तळ्याकाठी जाणीवपूर्वक जपलेल्या हिरवाईमुळे येथील सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी येथे जॉगिंग तसेच फेरफटका मारण्यासाठी परिसरातील नागरिक येत असतात.
कपडे धुणे, सांडपाणी बंद
थेट तलावात कपडे धुणे, गाई-गुरे तसेच वाहनांना आंघोळ घालणे तसेच सांडपाणी सोडल्यामुळे शहरांमधील तलावांची गटारे झालेली दिसतात. निळजे ग्रामपंचायतीने या सर्व अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. त्यामुळे तलावाचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत झाली आहे.
तळ्याकाठी ज्येष्ठ नागरिक भवन
या रम्य तळ्याकाठी निळजे ग्रामपंचायतीच्या वतीने २५ लाख रुपये खर्चून ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ ग्रामस्थ आणि २७ गाव संघर्ष समितीतील एक प्रमुख वसंत पाटील यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा