आष्टीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या समर्थकांसह स्वतंत्र आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. धोंडे यांच्या भूमिकेने पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या एकछत्री कारभाराला धक्का बसणार आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर धोंडे यांनी आपला स्वतंत्र मार्ग निवडल्यामुळे तालुक्यातील पक्षाचे धस, धोंडे व दरेकर या तीन ‘डी’मध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात ४ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी डावलल्यामुळे माजी आमदार धोंडे व साहेबराव दरेकर यांनी आमदार धस यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिष्टाईनंतर धस, धोंडे, दरेकराची ‘थ्री डी’ एकत्र आली. वर्षांनुवर्षे परस्परांचे विरोधक असलेले नेते एकत्र आल्यामुळे मतदारसंघात विरोधक राहिलेच नाहीत. मात्र, मागील काही दिवसांत या तिन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याचे काही घटनांवरून समोर आले. दोन माजी आमदारांना एकत्र ठेवून धस यांनी मतदारसंघावर एकछत्री अंमल चालवण्यात यश मिळविले. परंतु दोन महिन्यांपूर्वी अचानक धोंडे यांनी दुष्काळाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. सत्ताधारी पक्षात असताना धोंडे यांनी मोर्चा काढून शेतकऱ्यांसाठी आपण प्रसंगी कोणताही निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. परंतु या मोर्चापासून धस, दरेकर बाजूला असल्यामुळे धोंडे यांनी वेगळा मार्ग पत्करल्याचे स्पष्ट झाले होते.
या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निमित्ताने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादीबरोबर एकत्रित निवडणूक न लढवता स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला. आता दरेकर कोणाबरोबर राहतात की स्वतंत्र गट कायम ठेवतात, हे अजून स्पष्ट नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून धोंडे यांनी सवतासुभा निर्माण करीत राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारासमोर आव्हान निर्माण केले आहे, हे निश्चित!