तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक मंगळवारपासून सामूहिकरीत्या बेमुदत रजेवर गेले आहेत. पंचायत समितीसमोर त्यांनी धरणे आंदोलनही सुरू केले असून, त्यांच्या आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी ग्रामपंचायतींचे प्रशासन ठप्प झाले आहे.  
तालुक्यात दोन-तीन महिन्यांपासून काही ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वाद सुरू आहेत. त्यातून ग्रामपंचायतींच्या चौकशा, तपासणी सुरू असून त्यात प्रामुख्याने ग्रामसेवकच भरडले जात आहेत. याशिवाय सततच्या आंदोलनांनीही हा वर्ग त्रस्त आहे. आंदोलने राजकीय असली तरी त्यात ग्रामसेवकांनाच लक्ष्य केले जाते.
ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजयकुमार बनाते यांनी ही माहिती दिली. या वेळी विश्वास तनपुरे, धर्मराज गायकवाड, चंद्रकात तापकीर, कैलास तरटे, दत्तात्रय मेंगडे, मनोज गुरव, शरद कवडे, उजाराणी शेलार आदी ग्रामसेवक हजर होते.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे, की ग्रामसेवक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्देशानुसार काम करतात. मात्र तालुक्यात राजकीय नेत्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे, त्याचा त्रास आम्हाला होत आहे. त्यामुळे सर्वाचे मानसिक खच्चीकरण होत असून सर्वजण दबावाखाली काम करीत आहेत. तालुका स्तरावर ग्रामसेवकांच्या सतत बदल्या करण्यात येतात. नियमबाहय़ कामांसाठी राजकीय नेत्यांकडून दबाव येतो. राजकीय हेतूने प्रेरित होऊन लेखापरीक्षण झालेल्या आर्थिक वर्षांच्याही तपासणीचा आग्रह धरला जातो. त्याची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच गुन्हे दाखल करा, निलंबन करा यासाठी जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.  
ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करताना ग्रामपंचायतीला पूर्वसूचना देण्यात यावी. चौकशी निष्पक्ष करण्यात यावी, अर्जदाराच्या आव्हानाला बळी पडून एकतर्फी कारवाई करू नये, ग्रामसेवकाला बाजू मांडण्याची संधी मिळावी, ग्रामसेवकांना १ तारखेलाच पगार मिळावा आदी मागण्या संघटनेने केल्या असून त्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा