उरण नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या विषय समितीच्या निवडीत सत्ताधारी शिवसेना, भाजप व शेकापच्या महायुतीचाच वरचष्मा राहिला असून विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविल्याने सेना, भाजप व शेकापची महायुती उरण नगरपालिकेत टिकेल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र नगरपालिकेच्या विषय समितीत महायुतीने पुन्हा एकदा एकत्र येत आपले वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध केले आहे.
उरण नगरपालिकेच्या विषय समिती निवड प्रक्रियेत उरण मेट्रो सेंटर १ च्या भूसंपादन अधिकारी जयमाला मुरुडकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यामध्ये स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष गणेश शिंदे, बांधकाम सभापती- सायली म्हात्रे, आरोग्य सभापतिपदी लता पाटील, पाणीपुरवठा- हेमा पाटील, नियोजन व विकास- भावना कोळी, महिला बालकल्याण- प्रियांका पाटील यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे.