मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर सुटून मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याच्या गाडय़ांचा ताफा थेट रामनगरातील हिरणवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्या ठिकाणी त्याच्या समर्थकांनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, काही निवडक लोकांनाच त्याची भेट घेण्यासाठी सोडले जात होते.
एका हत्येच्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेप झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. येत्या ९ मे रोजी त्याच्या महेश नावाच्या मुलाचा विवाह नागपुरातील अहीर कुटुंबातील कन्येशी आहे. त्यामुळे या विवाह समारंभाला हजर राहता यावे म्हणून त्याने विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. मात्र, त्याना गृहविभागाच्या आदेशावरून पॅरोल देण्यात आला नव्हता. त्यानंतर तो उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या निर्देशानुसार आज पॅरोल देण्यात आला. अरुण गवळी कारागृहाबाहेर येणार असल्यामुळे त्याला घेऊन जाण्यासाठी मुंबईहून काही समर्थक नागपुरात सकाळी पोहोचले. कारागृहातून तो रामनगरातील हिरणवार यांच्या निवासस्थानी पोहोचला तरी या परिसरातील अनेकांना कुख्यात अरुण गवळी आपल्या परिसरात थांबला आहे, याची प्रारंभी माहितीच नव्हती. मात्र, गवळीचे समर्थक काही मिनिटांतच हिरणवार यांच्या घरी पोहोचल्यावर गवळीने एक एक करीत सगळ्यांची भेट घेत विचारपूस केली. हिरणवार यांच्या घरासमोर गाडय़ांचा ताफा व समर्थकांची गर्दी बघताच परिसरात अनेकांना वस्तीमध्ये कोणी तरी बहुचर्चित माणूस आल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी विचारपूस केली. अरुण गवळी आपल्या वस्तीत आल्याची माहिती मिळताच अनेकजण तो केव्हा एकदा घरातून बाहेर पडतो, याची वाट पहात असताना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तो बाहेर पडला आणि गाडय़ांचा ताफा विमानतळाकडे रवाना झाला.