गेली तब्बल चार दशके सातत्याने अभिनव उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाचन संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ग्रंथालीतर्फे यंदाच्या दिवाळीत जगातील निरनिराळ्या ठिकाणांहून तीन ई-दिवाळी अंक प्रसिद्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही अंकांचे संपादन आणि लेखन परदेशस्थ मराठी मंडळीनी केले असून त्या त्या प्रदेशातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन या अंकांमधून घडणार आहे. गेली पाच वर्षे ग्रंथाली परिवाराचे रूची मासिक १५ हजारांहून अधिक ई-मेल धारकांना नियमितपणे पाठविले जात आहे. यंदा या मासिकासोबत विविध देशांचे प्रतिनिधीत्त्व करणारे तीन ई-दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याची संकल्पना सुदेश हिंगलासपूरकर यांनी मांडली आणि धनंजय गांगल, परेश लिमये, कार्यकारी संपादक अरूण जोशी आदींच्या सहकार्याने त्याला मूर्त रूप आले. या तीन ई दिवाळी अंकापैकी आखाती देशांच्या अंकाचे संपादन सौदी अरेबियातून डॉ. उज्जवला दळवी करणार आहेत. अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या अंकाचे संपादन विद्या-हर्डिकर सप्रे, कॅनडातील अंकाचे संपादन स्मिता भागवत आणि युरोप-ऑस्ट्रेलिया या एकत्रित ई- दिवाळी अंकाचे संपादन शुभदा परांजपे योगिनी लेले यांनी केले आहे. विशेष म्हणजे जगभरातील मराठीजनांनी या ई- दिवाळी अंकांमध्ये लेख लिहिले आहेत. गेल्या शंभरहून अधिक वर्षांत जगभरात विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या मराठी समाजाची ओळख या ई-दिवाळी अंकांद्वारे होणार आहे. ई-मेलद्वारेच हे अंक जगभर वितरीत होणार आहेत.

Story img Loader