अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच सलग तीन दिवसांपासून पहाटे धुके आणि दिवसा ढगाळ वातावरण राहत असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदील झाले आहेत. आधी बेमोसमी पावसाचा बसलेला फटका आणि सध्याच्या ढगाळ वातावरणात द्राक्ष बागांना वाचविण्यासाठी किटकनाशके व औषधांची खरेदी वाढली असून त्यांची जादा दराने विक्री होत असल्याने उत्पादक त्रस्त झाले आहेत.
नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसात वातावरणात कमालीचे चढ-उतार होत आहेत. दिवाळीपश्चात वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला असताना मध्येच उकाडय़ाचे प्रमाण वाढले. दिवसा उष्मा तर रात्री काहिसे थंड असे वातावरण कायम आहे. त्यामुळे धड ना थंडी ना उकाडा अशी दोलायमान अवस्था असताना काही दिवसांपूर्वी निफाड व काही भागात बेमोसमी पावसाने झोडपून काढले. त्यात निफाड व आसपासच्या परिसरातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. या पावसानंतर वातावरणाचा नूर बदलला. सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रात्रीही तापमानाचा पारा फारसा खाली उतरत नाही. या एकंदर स्थितीमुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमणी तडकणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या व भुरी रोगाचा प्राद्र्रुभाव होण्याचा धोका वाढला आहे. आधीच बेमोसमी पावसाने फुलोऱ्यातील द्राक्ष बागेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. रोग प्रतिबंधक औषधांची सकाळ-सायंकाळ मोठय़ा प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक तर ढगाळ वातावरणामुळे बागेतच गुंतून पडला आहे. फुलोरा व परीपक्व अवस्थेतील द्राक्षबागांना ढगाळ व रोगट हवामानापासून बचाव करण्यासाठी उत्पादकांची धडपड सुरू आहे. ढगाळ हवामानाचा द्राक्षबागांवर परिणाम होत असला तरी कृषी विभागाने दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारले. ढगाळ हवामानामुळे मोठय़ा प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत आहे. चितेगाव येथे तर उत्पादकांनी द्राक्षांवर कुऱ्हाड चालविली. फवारणी करूनही द्राक्षबागा वाचण्याची शक्यता धूसर असल्याची काहींना साशंकता आहे. द्राक्ष मण्यांच्या आकार वृध्दीसाठी असणारी विशिष्ट औषधे जवळपास सर्वच कृषी विक्रेत्यांच्या दुकानातून गायब झाली आहेत. छापील किंमतीपेक्षा अधिक दराने किटकनाशके व औषधांची विक्री करू नये अशी कृषी विभागाची सूचना असली तरी नामांकीत कंपन्यांची विशिष्ट काही औषधे ५०० ते ७०० रुपये जादा दराने खरेदी करावी लागत असल्याची उत्पादकांची तक्रार आहे. किटकनाशके व औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण करून या वातावरणात विक्रेत्यांनी उत्पादकांना वेठीस धरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा