नाशिक येथे व्हॅलेंटाइन डे निमित्त भेटवस्तू खरेदी करताना युवती
कोणत्या राजकीय पक्षाची विरोधाची भूमिका आहे वा कोणता पक्ष समर्थनार्थ उभा आहे, याचा बिल्कूल विचार न करता युवा प्रेमीजन ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या रंगात रंगले असून आपल्या व्हॅलेंटाईनला खूश करण्यासाठी कोणती भेट योग्य ठरेल, याचा अंदाज लावत खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. त्यांच्या सरबराईसाठी अगदी छोटय़ा आकाराच्या टेडीपासून विविध फ्लेव्हरमधील चॉकलेट्स, शुभेच्छापत्रांसह भेटवस्तु बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.
पाश्चिमात्य असला तरी युवा वर्गात या दिवसाची क्रेझ अधिकाधिक वाढत आहे. त्यांच्या मदतीला आता वैविध्यपूर्ण यंत्रणाही आली आहे. टेक्नोसॅव्ही युवा वर्ग ऑनलाइन शुभेच्छापत्र, भेटवस्तु पाठवत आहेत. सुरावटीसह मिळणारे कॉफी मग, विथ लव्ह, डिअर फ्रेंड्स असा संदेश असणारी गुबगुबीत टेडीबेअरलाही अनेकांची पसंती लाभली आहे. शुभेच्छा पत्रासोबत बाजारात हृदयाच्या आकाराचे लाल रंगातील विविध गिफ्ट आहेत. त्याशिवाय, चॉकलेट, फोटो फ्रेम, आर्टिफिशियल रेड रोझ, सॉफ्ट टॉइज, डॉल, लव्ह बर्ड, कि चेन, हार्टशेप पिलो, डान्सिंग कपल, स्टॅच्यु असे विविध पर्यायही अनेकांनी स्वीकारले आहेत.
यंदाचे खास आकर्षण म्हणजे चॉकलेट बुके. अगदी ४० रुपयांपासून सहज उपलब्ध होणाऱ्या चॉकेलट बुकेत विविध फ्लेव्हर असून त्यांची किंमत एक हजार रुपयांपर्यंत आहेत. तीनचाकी सायकलमध्ये असणाऱ्या चॉकलेटसह चॉकलेट बास्केट, चॉकलेट पोते, आकर्षक बटवा, यांची भुरळ अनेकांना पडत आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या पाश्र्वभूमीवर यंदा व्हॅलेंटाइन डे रविवारी न येता इतर दिवशी येत असल्याने महाविद्यालयीन प्रेमीजनांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा