महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरासह जिल्हाभरात अभिवादन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील भडकलगेटजवळ दिवसभर अलोट गर्दी होती.
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा मिळाल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बुधवारी जल्लोष केला. या पाश्र्वभूमीवर अभिवादनासाठी मोठय़ा संख्येने युवक-युवती चौकाचौकांत एकत्र आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील पूर्णाकृती पुतळ्यासमोर अनेक विद्यार्थ्यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. शहरात या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात १८ तास अभ्यास हा उपक्रमही घेण्यात आला. शहरात विविध ठिकाणी आंबेडकरी विचारांच्या पुस्तकांची विक्री झाली. विविध शासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने एन ७, सिडको भागात अभिवादन करण्यात आले. या वेळी अ‍ॅड. रमेश खंडागळे यांचे भाषण झाले. इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिल्याबद्दल त्यांनी राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन केले. शिक्षणसम्राटांनी केलेले खासगीकरण, दलित ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, गायरान जमिनीचे रेंगाळलेले प्रश्न यावर एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
यशवंतराव चव्हाण, जवाहरलाल दर्डा, बाळासाहेब पवार स्मृतिदिन समितीच्या वतीने भडकलगेट येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी प्र. ज. निकम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, परिवहन कामगार सेनेचे अशोक पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विविध पक्ष-संघटनांनी भडकलगेट येथे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.