रोटरी क्लब, डोंबिवली (पूर्व) आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली (पूर्व) येथील राधाबाई साठे विद्यामंदिरमध्ये शालान्त परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आयोजकाचे प्रमुख डॉ. राजेंद्र रिसबूड यांनी उपस्थित विद्यार्थी ‘लोकसत्ता’मधील यशस्वी भव: सदर व मार्गदर्शन पुस्तिकेच्या साहाय्याने कशा रीतीने अभ्यास करीत आहेत, हे जाणून घेतले व आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा व परीक्षेत घवघवीत यश संपादन करावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.
‘लोकसत्ता यशस्वी भव!’मधून विज्ञान आणि तंत्रज्ञान व गणित या विषयाचे लेखन करणाऱ्या सुप्रिया अभ्यंकर यांनी परीक्षेची अंतिम तयारी करताना दैनंदिन अभ्यास कार्यक्रमाचे वेळापत्रक कसे करावे व त्याचा वापर प्रामाणिकपणे केल्यास त्याचे फायदे कसे मिळतात हे समजावून         सांगितले.
 वेळेचे नियोजन करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाबरोबरच थोडे मनोरंजन, बैठे खेळ अवश्य खेळावेत, असा सल्ला त्यांनी दिला. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच गणित विषयामध्ये उच्चस्तरीय विचार कौशल्यावर आधारित कशा प्रकारे विचारले जातात व त्यांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया पाठय़पुस्तकाच्या साहाय्याने कशा प्रकारे करावी हेही सुप्रिया अभ्यंकर यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.
या वेळी आयोजनप्रमुख डॉ.राजेंद्र रिसबूड, आयोजक महेंद्र रोजेकर, आमोद खरे,  मुख्याध्यापिका शुभांगी काजळे, वर्गशिक्षिका नितूशा हेडावू आदी उपस्थित होते.

Story img Loader