धरमपेठ पॉलिटेक्निकचा अभिनव उपक्रम
शहरातील धरमपेठ पॉलिटेक्निक च्यावतीने आयोजित वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशील उपकरणांची स्पर्धा ‘जेनेसिस  २०१३’ला विविध महाविद्यालयांच्या सहभागाने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभिनव उपक्रमासाठी महाविद्यालयाने एक  लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली. या उपक्रमाचा समारोप उच्चशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला.
समाजात विविध स्तरांवर काम करणारे उच्चविद्याविभूषित लोक त्या त्या क्षेत्रात काम करून प्रस्थापित होतात. अभियंता हा देशाच्या उभारणीत मोलाचा वाटा असतो. तंत्रशिक्षण हे यशस्वी अभियंता घडविण्याकरिता भक्कम पाया असतो, असे ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. या उपक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे  व विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. ‘जेनेसिस  २०१३’ सारखे वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन यापुढेही केले जाईल, असे धरमपेठ पॉलिटेक्निकचे प्राचार्य महेश बक्षी यावेळी बोलताना म्हणाले.
नागपूर पॉलिटेक्निकचे दीपक बर्डे व अंजुमन पॉलिटेक्निकचे राम राऊत यांना  ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. उमरेड पॉलिटेक्निकचे निखील झाडे व धरमपेठ पॉलिटेक्निकचे पलाश हाडके यांना ३० हजार रुपयांचे द्वितीय तर धरमपेठ पॉलिटेक्निकचे रजत चौधरी व सत्यजित कानेटकर यांना २० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक, प्रमाणपत्र व सृतिचिन्ह गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आले. परीक्षक म्हणून प्रा. शिवणकर, तुषार जोशी, मनीष करंदीकर, आयपीईलचे कालगावकर,विदर्भ निकेल कंपनीचे शिर्शीकर,  मनोज राय यांनी काम पाहिले. उपक्रमाच्या संयोजिका स्नेहल कुकडे यांनी आभार मानले.