ग्रंथ वाचून लोक शहाणे व्हावेत आणि बरोबरच पुस्तकांची विक्री व्हावी या उदात्त हेतूने ‘नागपूर नॅशनल बुक फेअर’मध्ये हजेरी लावलेल्या स्टॉलधारकांच्या पुस्तक विक्रीचा आलेख हळूहळू उंचावत असून नागपूरकर वाचकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
नवीन वर्षांच्या पहिल्या शनिवारपासून पुस्तक प्रदर्शन भरवण्याचा संकल्प सोडलेल्या नागपुरातील पुस्तक व्यवहाराशीसंबंधीत ज्येष्ठ मंडळींच्या प्रयत्नांनी गेल्या सहा वर्षांमध्ये चांगले यश संपादित केले आहे. म्हणूनच यावर्षी १७० स्टॉलधारकांनी कस्तुरचंद पार्कवरील प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. नागपूरसह, दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, बनारस आदी ठिकाणची नावाजलेली प्रकाशने आणि पुस्तक विक्रेत्यांनी चढाओढीने या प्रदर्शनात भाग घेतला आहे. नागपूरच्या नवनीत प्रकाशनने पहिल्यांदाच मुलांसाठी ‘दि अॅनिमल किंगडम’ आणि ‘द वंडर्स ऑफ दी सी वर्ल्ड’ ही थ्रीडी मधील पुस्तके बाजारात आणली आहेत. गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या फडके प्रकाशनच्या समीर जोशी यांनी क्रमिक पुस्तकांसह, नेट-सेट, ग्रामर, एमपीएससीची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. नागपूरकर केवळ बघे नाहीत तर पुस्तके विकत घेतात, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. याचधर्तीवर ‘आयड्रिम एसपोर लर्निग अकॅडमी’ने संवाद कौशल्य व मुलाखत तंत्रावर आधारित सॉफ्टवेअरसाठी आणि लातूरच्या विद्याभारती प्रकाशनाबरोबरच हिंदीतील वाणी आणि राजकमल ही प्रसिद्ध प्रकाशने लोकांची लक्ष वेधून घेत आहेत.
विशिष्ट ध्येयाने काम करणारे संघ साहित्य, आंबेडकरी साहित्य आणि इस्लामिक साहित्य प्रदर्शनाची खासियत म्हणता येईल. संघ साहित्याचा प्रचार आणि प्रसारातील शिस्तप्रियता संबंधित स्टॉलवर निदर्शनास येते. पॉकेटच्या मापाची पुस्तके कमी किमतीत इंग्रजी, मराठी आणि हिंदीत उपलब्ध करून देण्याची संघ साहित्याची किमयाही या प्रदर्शनाने केली आहे. इस्लाम धर्माविषयी असलेले लोकांचे समज-गैरसमज निस्तारण्याबरोबरच वर्तमानातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी इस्लाममधील उपाय सुचवणारी पुस्तके इस्लामिक बुक स्टॉलवर पहायला मिळतात. बौद्ध व आंबेडकरी साहित्य विक्रीसाठी दिल्लीच्या सम्यक प्रकाशनने पहिल्यांदाच प्रदर्शनात भाग घेतला असून त्यांची पाकिटे, कॅलेंडर आणि पुस्तकांच्या सुधारित आवृत्त्यांची देखणी बांधणी केलेली पुस्तके प्रदर्शनात ठेवली असल्याचे कपिल बौद्धा यांनी सांगितले. तांत्रिक पुस्तकांमध्ये टाटा-मॅग्राहिल आणि शब्द विश्वाशी निगडित ऑक्सफर्ड प्रकाशनने पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. एकूण १८ भाषेत पुस्तके प्रकाशित करणारे नॅशनल बुक ट्रस्ट, खानपानाच्या आवडीनिवडी ओळखून दिल्लीच्या निता मेहता यांची पुस्तके आणि विश्वकोशाच्या खंड निर्मितीचे महत्कार्य करणारे बालभारती प्रकाशन प्रदर्शनात चांगली विक्री करीत आहेत.
धार्मिक, अध्यात्मिक, ज्योतिष्यावर आधारित पुस्तकविक्रीसाठी नागपूरच्या दिलीप बुक एजन्सीने पहिल्यांदाच प्रदर्शनात भाग घेतला असून एजन्सीच्या प्रज्ञा खानापूरकर यांनी वाचकांच्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्याकडील स्वामी सवितानंद लिखित ‘स्तोत्र मंत्रांचे विज्ञान’ या पुस्तकाचा खप चांगला आहे. आयुर्वेद, संस्कृत साहित्यात संशोधनपर भूमिका वटवणारे वाराणसीचे चौखंबा संस्कृत संस्थान आणि मोतीलाल बनारसी यांच्या स्टॉलवर संस्कृतशी संबंधित उपलब्ध पुस्तके संस्कृत प्रेमींसाठी ज्ञानभंडार ठरत आहे. संगीत क्षेत्रातील दादा म्हणवणारे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील ‘संगीत कार्यालया’ने केवळ संगीत विषयाशी संबंधित पुस्तके प्रदर्शनात ठेवली आहेत. संधू सायंटिफिक एज्युकेशनल एडस् हा केवळ विज्ञानाचा प्रसार आणि प्रसार करणारा स्टॉलबरोबरच इतर अनेक स्टॉल स्वत:चे वैशिष्टय़ राखून आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय रिझव्र्ह बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ या बलाढय़ संस्था लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी म्हणून उद्बोधनाचे काम करण्यासाठी या प्रदर्शनात उतरली आहेत. त्यांचा खूप चांगला प्रभाव प्रदर्शनात दिसून येत आहे.
शिवाय रामन विज्ञान केंद्राची विज्ञान विषयक माहिती पुरवणारी बसही प्रदर्शनात आहे. प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन उद्घाटन कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रचे नंदकिशोर पुजारी यांनी पुढीलवर्षी प्रदर्शनात एटीएम उभारण्याचे आश्वासन दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा