जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन सामूहिक सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेत १५० शाळांमधून दीड लाख विद्यार्थ्यांनी, तर आंतरशालेय सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेत २२ शाळांनी सहभाग नोंदवला.
जिल्हा क्रीडा कार्यालय, क्रीडा भारती, शिक्षण विभाग व स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या वतीने शहरातील चिकलठाणा, सिडको, गारखेडा व मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या चार विभागांत या स्पर्धा झाल्या. आंतर महाविद्यालयीन सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांच्या गटात विवेकानंद महाविद्यालय, तर मुलींच्या गटात छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला.
आंतरशालेय सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेत विवेकानंद अ‍ॅकॅडमीने गेल्या ३ वर्षांपासून प्रथम क्रमांक मिळविण्याची परंपरा यंदाही कायम राखली. दुसऱ्या स्थानी किलबिल बालक मंदिर, तर तिसरा क्रमांक सरस्वती भुवन हायस्कूल व सोनामाता बालक मंदिर यांना विभागून देण्यात आला. सुशीलादेवी हायस्कूल (माध्यमिक) चौथे व चाटे स्कूलने पाचवे स्थान मिळविले. योगासन स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अक्षय खेडकर, प्रवीण पोटफोडे, अनिकेत वाघ, तर मुलींच्या गटात पायल जाधव, अपूर्वा बुके व सिल्वी शहा यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अक्षय आवारे, कार्तिक चाटे, ऋषिकेश कबाडी, मुलींच्या गटात योगिता गावंडे, दीप्ती पाटील व अनुष्का नारळे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. १९ वर्षांखालील गटात अभिषेक चौथे, सुमीत गवळी, हर्ष जाधव, मुलींच्या गटात यशोदा जाधव, शीतल जयपूरकर व शीतल जाधव यांनी पहिले ३ क्रमांक मिळविले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पातंजली योग समितीचे राम बारस्कर, शिवाजीराव कवडे, चंद्रकांत कदम, रेणुका कुंदे, प्रमिला आव्हाळे, श्याम भुतडा आदींनी काम पाहिले.