घरगुती इकोफ्रेण्डली गणपतींची मुंबईतील संख्या वाढत असून या वर्षी फक्त मुंबईत तब्बल ८० हजार लोकांनी इकोफ्रेण्डली गणपतीची स्थापना केली होती. हे यश ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या इकोफ्रेण्डली गणेशोत्सव स्पर्धेसारख्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व पर्यावरणप्रेमी लोकांचे आहे, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग यांनी ‘इकोफ्रेण्डली घरगुती गणेश स्पर्धा’ उपक्रमाची प्रशंसा केली.
लोकसत्ता आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या वतीने आयोजिण्यात आलेल्या ‘इकोफ्रेण्डली घरगुती गणेश स्पर्धे’च्या बक्षीस समारंभात त्या बोलत होत्या. गणेशोत्सवाच्या काळात होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आपणही आपला हातभार लावू शकतो, ही भावना रुजवण्याच्या दृष्टिकोनातून टीजेएसबीच्या मदतीने ही स्पर्धा घेण्यात आली आली होती. स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात पार पडला. या वेळी तब्बल सत्तावीस जणांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख धनादेश देऊन गौरवण्यात आले. टीजेएसबी बँकेचे महाव्यवस्थापक विद्यासागर नामजोशी यांच्यासह बँकेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ने ऑगस्ट महिन्यात इकोफ्रेण्डली गणेशोत्सव सर्धेची घोषणा केली आणि संपूर्ण राज्यभरातून त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी इकोफ्रेण्डली गणपतीच्या माध्यमातून मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पना इतक्या सुंदर आणि पर्यावरणाभिमुख होत्या की, कुणाची निवड करायची, असा प्रश्न आमच्यासमोर होता,’ असे स्पर्धेचे परीक्षक रविराज गंधे यांनी सांगितले. तर प्रत्येक ठिकाणी फुलांची-फळांची आरास, विजेचा कमीत कमी वापर, सजावटीसाठी वापरली जाणारी प्रत्येक वस्तूही पर्यावरणपूरक अशी पाहायला मिळाल्याचे दुसरे परीक्षक अविनाश कुबल यांनी सांगितले. ‘विविध कारणांमुळे होत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यात अशा पध्दतीने लोकांचा मिळणारा प्रतिसाद नक्कीच समाधनकारक आहे,’ असे मत पर्यावरण विभागाचे सदस्य सचिव राजीवकुमार मित्तल यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली चळवळ पुढे चालू राहिली पाहिजे आणि हा उपक्रम त्या चळवळीचा एक भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. तर ‘शासनाने भूमिका बदललेली आहे. येणारे सर्व उत्सव शासनाच्या नव्हे तर लोकसहभागातून, लोकांत जाऊन साजरे केले जाणार असून ही परिवर्तनाची नांदी आहे,’ अशा शब्दांत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे जनसंपर्क आधिकारी संयज भुस्कुटे यांनी आपली भूमिका मांडली. ‘समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कामाची ही पावती आहे. जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. त्यांच्याच सहभागातून हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो,’ असे मत टीजेएसबीचे मुख्य कार्यकारी आधिकारी सतीश उत्तेकर यांनी व्यक्त केले.    
‘लाईव्ह’ कारागिरी
बक्षीसवितरण सोहळा सुरू असताना कोल्हापूरचे शिल्पकार गुणेज गजानन आडवल यांनी दोन इकोफ्रेण्डली गणपतीच्या मूर्ती बनविल्या.

पर्यावरणाची काळजी घेणे हे राष्ट्रीय कर्तव्य
आपल्या सण आणि उत्सवांचे निसर्गाशी अनमोल नाते आहे. हे पारंपरिक सण-उत्सव पर्यावरणाला समृद्ध करणारे असावेत. कारण समृद्ध पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.
    – संजय देवतळे,
    पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री

उत्सव पर्यावरणस्नेही असावेत
वर्षभरातील प्रत्येक उत्सव हा पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करण्याची नितांत गरज आहे. याकरिता आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
    – सचिन अहिर,
    पर्यावरण व गृहनिर्माण राज्यमंत्री

प्रबोधन चळवळ सक्षम
व्यवसायापलीकडे जाऊन पर्यावरणविषयक जागृती करणे टीजेएसबी आपले कर्तव्य मानते. इकोफ्रेण्डली घरगुती गणेश स्पर्धा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून ही स्पर्धा पर्यावरणाविषयक प्रबोधन चळवळ सक्षम करण्यास साहाय्य करणारी ठरली आहे.
    -विद्याधर वैशंपायन,
    अध्यक्ष, टीजेएसबी सहकारी बँक

विजेत्यांची नावे
संतोष घोलवणकर, विलेपार्ले – प्रथम पारितोषिक, संतोष व्हर्टेकर, शांतिवन मार्ग – द्वितीय पारितोषिक.
उत्तेजनार्थ -अमेय सुरेंद्र वैद्य, अनंत हरिषचंद्र शिंदे,  अतुल काटदरे, फाल्गुनी आशित, गौरी शरद घोणे, किशोर रतीलाल पाटील, क्रांती प्रसन्नकुमार पाटील, मधुरा मिलिंद जोशी, मयूर मनोहर अजिंक्य, प्रज्ञा विनायक सहस्रबुद्धे, आश्विनी अमित मंजुरे, मानसी नाईक, प्रफुल्ल राज, प्रकाश दामोदर जाधव, प्रसाद आरविंद फाटक, रश्मी मतकरी, संदेश एम. पाटील, सुधाकर आंबेकर, उषा शिंदे, विनोद घोलप, संजय धोंडू कराड, आनंद जयंत लेले, राजेश दिवाकर कुलकर्णी, किरण पांढरकोटे, सरिता ए. गुजराथी.

Story img Loader