राज्यात प्रसिद्ध असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रा महोत्सवास गुरुवारी मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेसाठी लाखो भाविक येरमाळनगरीत दाखल झाले असून उद्या (शुक्रवारी) चुना वेचण्याचा यात्रेचा मुख्य दिवस आहे.
येडेश्वरी देवीची चैत्र महिन्यातील यात्रा राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध आहे. गुरुवारी पौर्णिमा असल्याने सकाळी देवीची पूजा व महाआरती करून भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. आई राजा उदो उदोचा जयघोष करीत देवीचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनासाठी आतूर भाविकांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन दर्शनरांगा गाठल्या. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांतून सुमारे तीन ते चार लाख भाविक येडेश्वरीच्या दर्शनास येरमाळ्यात दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम असून त्यानिमित्त सुमारे १० ते १२ लाख भाविक उपस्थिती लावतील, असा अंदाज आहे. गुरुवारी मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून आलेले भाविक देवीला नैवद्य दाखविण्यासाठी एखाद्या झाडाचा आधार घेऊन स्वयंपाक करण्याची लगबग करीत होते. येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दरहन दाखल झालेले भाविक एकमेकांना हळद लावून आनंद करीत होते. भाविकांची संख्या वरचेवर वाढतच चालली आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करता, येणाऱ्या भाविकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या साठी मंदिर व आमराई परिसरात, तसेच आवश्यक ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गावातही यात्रेच्या पाश्र्वभूमीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे यात्राकालावधीत पाण्याची टंचाई जाणवणार, अशी चिन्हे दिसत आहेत. दर्शनासाठी बसने येणाऱ्या भाविकांसह खासगी वाहनांद्वारे येणाऱ्या भाविकांचीही संख्या अधिक असल्याने येरमाळा येथे वाहनांचीही गर्दी मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. येरमाळा नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा