सरत्या वर्षांला निरोप व नववर्षांचे स्वागत याचे औचित्य साधून अहमदपुरात आयोजित शिबिरात २५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. अहमदपूर शहरात नव्या वर्षांचे स्वागत गेल्या काही वर्षांपासून अभिनव पद्धतीने केले जाते. उमाकांत कासनाळे यांनी रक्तदान करून नववर्षांचे स्वागत करण्याची कल्पना मांडली. शहरात ठिकठिकाणी फलक लावून याची वातावरणनिर्मिती करण्यात आली.
अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मध्यरात्री शिबिराचे उद्घाटन केले. रक्तदान करण्यात अहमदपूर तालुका आघाडीवर असून, नव्या वर्षांत असा वेगळा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. वर्षांचे बाराही महिने रक्तदान शिबिर घेऊन दरवर्षी सुमारे ३ हजार बाटल्या अहमदपूर तालुक्यातून संकलित केल्या जातात. लातूरच्या भालचंद्र रक्तपेढीच्या सहकार्याने अहमदपुरात आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस निरीक्षक डी. के. चौरे, महेश बँकेचे उपाध्यक्ष शंकरराव जाधव आदींनी सहभाग नोंदविला. अहमदपूरकरांनी हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल जिल्ह्य़ात त्यांचे कौतुक होत आहे.

Story img Loader