बदलापूर शहराच्या मांजर्ली विभागात एका अकृषिक जागेवर हरित पट्टय़ाचे आरक्षण टाकल्याने जागेचे मालक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे. विशेष म्हणजे या जागेवर शाळा आणि घरे आहेत. तरीही पालिकेने टाकलेल्या आरक्षणाविरोधात सखाराम जाधव गेली दहा वर्षे शासन दरबारी न्याय मागत आहेत. मात्र त्यांच्या विनंत्यांना अद्याप लालफीतशाहीने भीक घातलेली नाही.
बदलापूर शहराच्या पश्चिम विभागात मांजर्ली येथे गट क्र. ५३ मध्ये भूखंड क्र. ११, १४ आणि १५ ही जागा सखाराम जाधव यांच्या मालकीची आहे. १९६३ पासून त्या जागेत त्यांचे राहते घर आहे. त्याचप्रमाणे याच जागेत भाग्यश्री विद्यालयही आहे. जाधव यांची जागा अकृषिक असल्याच्या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून २००५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात हरित पट्टय़ाचे आरक्षण टाकण्यात आले. नियमानुसार अकृषिक जमिनीवर हरित पट्टय़ाचे आरक्षण टाकता येत नाही. विशेष म्हणजे जाधव यांच्या जागेशेजारी शासनाची तब्बल ५० एकर जागा आहे. तरीही चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकून शासकीय अधिकाऱ्यांनी नाहक त्रास दिल्याचा जाधव यांचा दावा आहे. यासंदर्भात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देऊनही त्यांना न्याय मिळू शकलेला नाही.
सखाराम जाधव यांनी त्यांच्या या मालकीच्या जागेत १९६३ मध्ये घरे बांधून भाडय़ाने दिली आहेत. मात्र जीर्ण झालेल्या या घरांची पुनर्बाधणी हरित पट्टय़ाच्या आरक्षणामुळे रखडली आहे. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले ८४ वर्षीय जाधव चुकीच्या पद्धतीने टाकलेले आरक्षण रद्द करण्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालून थकले आहेत.

Story img Loader