भीषण दुष्काळाने मराठवाडय़ाला घेरले आहे. माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे जनावरे व झाडांची काय कथा? अशा चक्रात पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून ‘आपलं घर’च्या चिमुकल्यांनी दुष्काळाला आव्हान दिले. त्याचीच फलश्रुती म्हणून अभूतपूर्व पाणीटंचाईतही ‘आपलं घर’च्या २१ एकर क्षेत्रावरील माळ अडीच हजार झाडांच्या हिरवाईने बहरला आहे.
पावसाळय़ात धरणी हिरवा शालू नेसते, तसे मनोहारी चित्र ‘आपलं घर’ने घेतलेल्या अथक परिश्रमामुळे रखरखीत उन्हातही पाहावयास मिळत आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले ‘आपलं घर’ २१ एकरांतील माळरानावर वसले आहे. आजूबाजूचा सर्व परिसर दुष्काळाच्या झळा सोसत करपून गेला, मात्र ‘आपलं घर’मधील अनाथ, निराधार मुलांनी दु:खाने होरपळून निघालेला, ऐन बालवयात करपून गेलेला वेदनेचा कोपरा विसरून जपलेली हिरवळ निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारी आहे. या संपूर्ण माळरानावर एक हजार ५०० मोठी, तर एक हजार लहान झाडे आहेत. माणसांना हैराण करणाऱ्या रखरखीत उन्हातही ही वनराई टवटवीत आहे.
गतवर्षी राष्ट्रसेवा दलाच्या या चिमुकल्या सैनिकांनी नव्याने ७०० झाडे डोंगराच्या बाजूने लावली. डोंगरदऱ्यात चऱ्या खोदल्या. माती अडवली, झाडांच्या बुडाला पालापाचोळा गोळा करून ठेवला, डोंगररांगाववर छोटे छोटे बंधारे घातले. या छोटय़ा छोटय़ा कामांमुळेच आज २१ एकर क्षेत्रावर भलीमोठी हिरवळ निर्माण झाली. आगामी काळात यातील आवळय़ांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे, तसेच िलबोळीपासून साबण बनविण्याचे प्रयत्नही ‘आपलं घर’ने सुरू केले आहेत. केवळ आपला परिसर हिरवागार करून ही मंडळी थांबली नाहीत, तर सर्व सभोवताल हिरवागार व्हावा, यासाठी ‘आपलं घर’मध्ये रोपवाटिका विकसित केली जात आहे. या रोपवाटिकेत निराधार, अनाथ मुलांनी तयार केलेली आंबा, चिंच, िलब, आवळा, मिरची, वांगे आदी रोपे शेतकऱ्यांना मोफत दरात उपलब्ध करून दिली जात आहेत.
यंदाच्या पावसाळय़ात आणखी एक हजार झाडे लावण्यासाठी श्रमदानातून खड्डे खोदणे, माती भरणे यासाठी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजनही केले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक शिवाजी पोतदार यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षांत दरवर्षीप्रमाणे ‘आपलं घर’मध्ये नवीन ४० अनाथ, निराधार मुले-मुली दाखल होतील. हिरव्यागार वनराईने डवरलेल्या ‘आपलं घर’मध्ये गावाकडील दु:खद घटना विसरून त्यांना कुशीत घेण्याचे सामथ्र्य आहे. त्याला ही हिरवाई सकारात्मक प्रतिसाद देते. निसर्गरम्य वातावरणात खेळ, गाणी, गप्पागोष्टी याबरोबरच अभ्यासात ही मुले सहज रमून जातात. या मुलांच्या मनातील दु:खाचे कोपरे ‘आपलं घर’च्या माळाप्रमाणे हिरवेगार करण्यासाठी ‘आपलं घर’ला पालकत्व घेणाऱ्यांची प्रतीक्षा असल्याचेही पोतदार यांनी सांगितले. कामाची आवड असणाऱ्या मित्रांची, आपली शक्ती, बुद्धी देणाऱ्या मित्रांची आणि अनाथ मुलांच्या स्वप्नात हिरवा रंग पेरणाऱ्या पालकांशिवाय हे काम पूर्णत्वास जाणार नसल्याचेही पोतदार यांनी सांगितले.
अभूतपूर्व पाणीटंचाईत माळरानावर हिरवाई बहरली !
भीषण दुष्काळाने मराठवाडय़ाला घेरले आहे. माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे जनावरे व झाडांची काय कथा? अशा चक्रात पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून ‘आपलं घर’च्या चिमुकल्यांनी दुष्काळाला आव्हान दिले.
First published on: 15-05-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greenery grown on moorland in heavy water shortage days