थेंबभर पाण्यासाठी भटकंती, पाण्याचा अपव्यय यावर विविध मार्गानी जनजागृती होत असली, तरी लक्षात कोण घेतं? पाणी कमी पडले की मोच्रे व मागणीचा हक्क सांगितला जातो. या पाश्र्वभूमीवर संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाण्याचे मोल जनतेला पटवून देण्यासाठी जलसाक्षरतेचा संदेश देणारी ५ हजार पत्रे तयार केली आहेत. मुलांची ही संदेशपत्रे मनाचा ठाव घेणारी आहेत.
बीड जिल्हा कायम दुष्काळाच्या छायेत असतो. पाण्याची टंचाई तर पाचवीला पुजलेली. सरकार आहे ते पाणी काटकसरीने कसे वापरावे या साठी विविध मार्गानी जनजागृती करते. दूरचित्रवाहिनीवरुन लक्षवेधक जाहिरातीही दाखविल्या जातात. तरीही लक्षात कोण घेतं, असा प्रश्न नेहमीच पाणीटंचाई निर्माण झाली की पडतो. स्वत नामानिराळे राहून इतरांनी काटकसर करावी, अशीच अनेकांची मानसिकता दिसून येते. मात्र, आता बीड शहरातील संस्कार विद्यालयाच्या मुलांनीच आगळा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांनी ही संकल्पना आपल्या लेखणीतून सर्वासाठी संदेशपत्राच्या माध्यमातून खुली केली. संस्कार, समाजसेवा संघाचे सिद्धी गुरखुदे, रेवती महामुनी, प्रज्ञा काकडे, संतोषी ठाकूर, चंचल गुरखुदे, सर्वेश थिगळे, जयराम िशदे, प्रगती जाधव, पठाण सबा खानम यांच्यासह ४७ विद्यार्थ्यांनी या अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. आपल्या भागातील, परिसरातील लोकांमध्ये पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने सुमारे ५ हजार संदेशपत्रे या विद्यार्थ्यांनी तयार केली. या संदेशपत्राचे प्रकाशन संस्कार प्रबोधनीचे संचालक डॉ. शरद रायते, विधीज्ञ कालिदास थिगळे, रामराव थेटे, नामदेव क्षीरसागर, प्रशांत थेटे, मुख्याध्यापक एल. एस. जोशी, सुधीर निमगांवकर व आर. टी. िशदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. थेंबभर पाण्यासाठी अनेकांना होणारे कष्ट या माध्यमातून प्रत्येक थेंब वाचवण्याचा संदेश या पत्रातून देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संदेशपत्राच्या मोहिमेला संस्कार जलसाक्षरता अभियान हे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत एक हजार लोकांना संदेशपत्राचे वितरण करण्यात आले. जलसाक्षरतेचा प्रसार, प्रचार थेट लोकांपर्यंत जावा, या उद्देशातून सुरू केलेल्या पाणी व्यवस्थापन विद्यार्थी चळवळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Story img Loader