यंदा जिल्हाभरात सरासरी १०३ टक्के पाऊस झाला असला, तरी १०पैकी ४ तालुक्यांतील पाणीपातळीत मात्र घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणात आढळून आले आहे.
सरकारच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबरअखेर भूजल सर्वेक्षण विभाग निरीक्षण विहिरीचे अहवाल नोंदवतो. जिल्हय़ातील १० तालुक्यांत १०९ निरीक्षण विहिरी असून, त्याच्या अभ्यासाअंती पाणीपातळीत तालुकानिहाय घट अथवा वाढ याची नोंदणी करण्यात आली. लातूर तालुक्यातील पाणीपातळीत तब्बल १.९१ मीटर घट झाली. निलंगा तालुक्यात ०.६७ मीटर, औसा ०.४० मीटर तर रेणापुरात १३५ टक्के पाऊस होऊनही ०.२७ मीटर पाणीपातळीत घट झाली. शिरूर अनंतपाळ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही पाणीपातळीत मात्र २.२८ मीटरने वाढ झाली. जळकोट तालुक्यात २.५० मीटर, अहमदपूर तालुक्यात १.६३ मीटर, उदगीर १.०२ मीटर, चाकूर ०.७४ मीटर, तर देवणी तालुक्यात ०.३० मीटरने पाणीपातळीत वाढ झाली. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ऑक्टोबरच्या सरासरी पाणीपातळीत घट नोंदवण्यात आली.
जिल्हय़ात १४ गावांमधील पाणीपातळीत २ मीटरपेक्षा अधिक घट झाली. या गावांत जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. सरकारच्या निकषानुसार ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची वेळ येणार आहे. या वर्षी लातूर व औसा तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पाणीपातळीत घट झाली, तर रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस होऊनही काळय़ा मातीचे प्रमाण अधिक आहे. परिणामी पाणी झिरपण्यास वेळ लागत असल्यामुळे ऑक्टोबरअखेर पाणीपातळीत घटच नोंदवली गेली. असे असले, तरी हळूहळू पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता भूजल विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. जळकोट तालुक्यात १ हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, त्या मानाने पाणीपातळीत समाधानकारक वाढ नाही. कारण या भागातील जमिनीत पाणी मुरवून ठेवण्याची क्षमता कमी आहे. पडणारा पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवला गेला पाहिजे. जितका पाऊस पडतो, त्यापेक्षा पाण्याचा उपसा कमी व्हायला हवा. पडलेल्या पावसापेक्षा पाण्याचा उपसा अधिक होत असल्यामुळे पाणीपातळीत दरवर्षी घट होत आहे. ‘दोन पावले पुढे अन् चार पावले मागे’ अशीच वाटचाल पाणीपातळीची होत असताना दिसते. प्रत्येक गावाने आपल्या गावात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व जमिनीतून पाणी घेण्याचे प्रमाण याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सरकारच्या लेखी विहिरीच्या नोंदी असल्या, तरी विंधनविहिरीची नोंद एकाही गावात योग्य प्रमाणात केली गेली नाही. एखाद्या शेतकऱ्याने स्वत:हून तलाठय़ाकडे नोंद केली असेल तरच त्या विंधनविहिरीची नोंद होते. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण विंधनविहिरी किती, याचा आकडा मात्र कोणालाही सांगता येत नाही.
बोरगाव, जवळा, कारसा, निवळी, टाकळी, हरंगुळ, नांदगाव, गंगापूर, आलमला, ब्रह्माची वाडी, डांगेवाडी, लांबोटा, आंबुलगा, रेणापूर या गावांत पाणीपातळीत २ मीटरपेक्षा अधिक घट झाली.
महसूल विभागाकडे सर्व प्रकारच्या नोंदी घेतल्या जातात. लोकांच्या प्रबोधनासाठी व पाणीपातळी वाढवण्यासाठी मोहीम घ्यायची असेल, तर त्यासाठी जिल्हय़ातील एकूण विंधनविहिरींची संख्या, तुषार व ठिबक सिंचनाचा होत असलेला कमी वापर याची माहिती एकत्रित आणण्याची गरज आहे. जिल्हय़ातील पाणीपातळीत वाढ व्हायला हवी, याची तळमळ असणारे अधिकारी महसूल विभागात कमी होत असल्यामुळे या बाबींकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. दिवाळीनिमित्त महसूल विभागानेच जिल्हय़ातील पाणीपातळीत वाढ करण्याचा संकल्प करून त्या दृष्टीने आखणी करण्याची गरज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा