नागपूर एनसीसी मुख्यालयाचे ग्रुप कमांडर म्हणून ग्रुप कॅप्टन महेश उपासनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजपासून सूत्रे सूत्रे स्वीकारली. मूळ नागपूरचेच असलेले ग्रुप कॅप्टन उपासनी यांचे शालेय शिक्षण बिशप कॉटन स्कूलमध्ये झाले. त्यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ सायंसमधून बी.एस्सी.ची पदवी घेतली. डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून त्यांनी एल.एल.बी. केले. चेन्नई येथून त्यांनी जनसंवाद पदविका मिळविली असून हैदराबाद येथून एम.बी.ए. केले आहे. त्यांनी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीचा स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अभ्यासक्रम वॉशिंग्टन डीसीमधून पूर्ण केला आहे. नागपुरातील नंबर २ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एनसीसी एअर विंगचे छात्रसैनिक असताना त्यांनी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होऊन संपूर्ण भारतातील छात्रसैनिकांमध्ये सवरेत्कृष्ट छात्रसैनिकाचा बहुमान प्राप्त केला होता. नंबर ४ महाराष्ट्र बटालियनचेही ते माजी छात्रसैनिक आहेत. त्यांना १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते प्राईम मिनिस्टर रॅलीदरम्यान प्राईम मिनिस्ट बॅटन देऊन सन्मानित करण्यात आले होते. गुणवंत छात्रसैनिकांसाठी असलेल्या चीफ ऑफ एअर स्टाफ शिष्यवृत्तीसाठीही त्यांची निवड झाली होती. एअर कॅडेट एक्चेंग प्रोग्रॅमसाठी ब्रिटनमध्ये जाण्याची संधीही त्यांना मिळाली होती.
ग्रुप कॅप्टन महेश उपासनी यांना  १९९२ साली भारतीय वायुदलाच्या फ्लाईंग नेव्हिगेशन शाखेत कमिशन मिळाले. त्यांना २५०० तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव असून ते प्रशिक्षित नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची नागपुरात कोलकाता आणि नागपूरचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती आता नागपूर एनसीसी मुख्यालयाचे प्रमुख म्हणून झाल्याने नागपुरातील छात्रसैनिकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आतापर्यंतच्या वायुदलाच्या सेवाकाळात त्यांना वायुदल प्रमुख आणि उपप्रमुखांची शिफारस सन्मानपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांच्यावर जनसंपर्क अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी राहणार आहे.

Story img Loader