पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचे श्रेय घेण्यासाठी चौथीच्या मुलांवर सामूहिक संस्कार करण्याच्या कुप्रवृत्तीस चपराक देणारा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला असून नवी मुंबईतील संबंधित परीक्षा केंद्र बंद करून त्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळास दिले आहेत. नवी मुंबईतील वर्षां सुधीर दाणी आणि काही इतर जागृत पालकांनी या सामूहिक कॉपी प्रकरणाचा पाठपुरावा केला. सामूहिक कॉपी प्रकारामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याने या परीक्षा पद्धतीतील ठळक दोष दूर करावेत, अशी अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत.
बेलापूर येथील विद्याप्रसारक हायस्कूलमध्ये २००८ साली घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एका वर्गात स्वत: पर्यवेक्षिकेने भाषा व समाजशास्त्र विषयांच्या सर्व ५० प्रश्नांची उत्तरे सांगितली. एका विद्यार्थिनीने ही बाब पालकांच्या लक्षात आणून दिली. पालकांनीही त्वरित ही बाब नवी मुंबईचे आयुक्त, महापालिका शिक्षणाधिकारी, ठाणे शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. मात्र शासकीय यंत्रणांनी सुरुवातीस त्यांना दाद लागू दिली नाही. अखेर माहितीच्या अधिकाराने ज्या वर्गाविषयी आक्षेप होते, तेथील २५ पैकी १७ विद्यार्थ्यांना समान गुण असल्याचे आढळून आले. त्या असाधारण गुणवत्तेविषयी पालकांनी राज्य परीक्षा परिषदेकडे पाठपुरावा केला. अखेर चौकशीत या केंद्रात परीक्षेच्या वेळी सामूहिक कॉपी झाल्याचे सिद्ध झाले.
शिष्यवृत्ती परीक्षा पद्धतीतील त्रुटी
प्रज्ञावान व गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. मात्र स्पर्धा युगात विद्यार्थ्यांपेक्षा शाळा तसेच शिक्षकांनीच या परीक्षा प्रतिष्ठेच्या केल्याने येनकेनप्रकारेण उत्तम निकालासाठी विद्यार्थ्यांवर सामूहिक कॉपीचे संस्कार केले जातात. मुरबाड तालुक्यातही दोन वर्षांपूर्वी (२०१०-११) असाच सामूहिक कॉपीचा प्रकार घडला होता. शैक्षणिकदृष्टय़ा मागास असणाऱ्या या तालुक्यातून तब्बल २८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. याप्रकरणी शहापूर तालुक्यातील नॉलेज अॅकॅडमीने आक्षेप घेतल्यानंतर गेल्या वर्षी मुरबाडमधील परीक्षा केंद्रांवर भरारी पथके नेमण्यात आली. त्यामुळे मुरबाडमध्ये कॉपी झाली नाही, पण कल्याण, पालघर, डहाणू व अन्य ग्रामीण भागात मात्र कॉपीचे प्रकार वाढले. या सामूहिक कॉपीमुळे पात्रता नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, आधी पुरेसा अभ्यास करूनही कमी गुण मिळाल्याने हुशार विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो.
तरच होईल खरीखुरी शिष्यवृत्ती परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ हेतू साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र अनिवार्य करावे, या परीक्षेच्या यश-अपयशाची सांगड शिक्षक अथवा शाळांच्या प्रगतीशी घालू नये, सामूहिक कॉपी टाळण्यासाठी अ, ब, क आणि ड असे चार वेगवेगळे प्रश्नपत्रिका संच असावेत, विद्यार्थ्यांना त्यांची शाळा केंद्र म्हणून असू नये. किमान पाच प्रश्न वर्णनात्मक असावेत आदी सूचना पालकांनी केल्या आहेत. यंदा २३ मार्च रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.