पारंपरिक पिकांमुळे शेतकरी मागे पडला, हे खरे आहे; परंतु जिल्ह्य़ातील आसगावसारख्या परिसरात समूहशेतीद्वारे भाजीपाला, फूलशेती करण्यासाठी शेतकरी पुढे आले, हे आशादायक चित्र आहे. या शेतकऱ्यांना तांत्रिक साहाय्य, कर्जपुरवठा होण्यासाठी पाहिजे ती मदत करू. भांडवल व बौद्धिक गुंतवणूक करणाऱ्या सुशिक्षित शेतकऱ्यांना एकत्र आणणे हे लोकमंगल शेतकरी मंडळाचे कौशल्य वाटते. यामुळे शेतीमध्ये क्रांतिकारी बदल निश्चित होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सच्चिंद्र सिंह यांनी केले.
 येथील लोकमंगल शेतकरी मंडळाच्यावतीने शेडनेट, पॉलीहाऊस या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डुबे, कृषी अधिकारी चुलबुले, तहसीलदार सुशील वैद्य, तालुका कृषी अधिकारी पंचभाई, लोकमंगल शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अनिल मेंढे उपस्थित होते. डुबे म्हणाले, शेतकऱ्यांनी अडचणींना सामोरे जाऊन नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेती केली तर ती फायद्याची ठरेल, यावर भर द्यावा. संघर्षांतून मिळणारा आनंद हा चिरंतन असतो.
चुलबुले यांनी दरवर्षीप्रमाणे शेडनेट शेतीसाठी पुरेसे लक्षांक येत नाही म्हणून जिल्ह्य़ाचा कोटा कमी आहे, पण लोकमंगल शेतकरी मंडळाने एकत्रित प्रस्ताव दिल्यामुळे कोटा वाढविण्यासाठी पुण्यातील संचालक स्तरावरील बैठकीत प्रयत्न करू, असे सांगितले. अनिल मेंढे यांनी, लोकमंगल शेतकरी मंडळाचा उद्देश, आत्मनिर्भर शेतकरी व ग्राहकांना सकस अन्नधान्याचा, स्वस्तात पुरवठा होत असल्याचे सांगितले. या मंडळाने १६ प्रस्ताव पाठविले असून आणखी काही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी ऐकून घेतल्या.
बहुतेकांनी बँकिंगच्या अडचणी सांगितल्या. या चर्चासत्रात परिसरातील सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र फुलबांधे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल ब्राह्मणकर यांनी मानले.