पाचगाव सरपंच पदाच्या निवडीतून गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक या काँग्रेसच्या दोन गटात धुमसत असलेल्या वादाचा शनिवारी स्फोट झाला. मागासवर्गीय महिला गटासाठीच्या निवडणुकीत राधिका खडके यांची निवड झाल्यानंतर प्रतिस्पर्धी गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याने सरपंचासह कांही सदस्य किरकोळ जखमी झाले. तसेच जमावाने पोलीस व्हॅनवर दगडफेक करून मोठी नासधूस केली. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. शनिवारी पाचगावात दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारी प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात पाचगाव ग्रामपंचायत आहे. निवडणुकीपूर्वीपासूनच या गावात सतेज पाटील व महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक या गटात सातत्याने संघर्ष होत होता. निवडणुकीमध्ये पाटील गटाने १०, तर महाडिक गटाने ७ जागांवर विजय मिळविला होता. सत्ता पाटील गटाची असली तरी मागासवर्गीय सरपंच पद महाडिक गटाकडे असल्याने या गटाचाच सरपंच होणार असे वाटत होते. महाडिक गटाने तसा दावाही करून हालचाली सुरू केल्या होत्या. तर पाटील गटातील राधिका खडके या मागासवर्गीय समाजाच्या आहेत. गनिमी कावा करीत खडके यांचा मागासवर्गीय जातीचा दाखला काढण्यात आला. पाटील गटाच्या खडके, महाडिक गटाच्या शोभा भालकर यांच्यात सरपंच पदाची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले होते. त्यातूनच काल शुक्रवारीच भालकर यांच्या घरावर जमावाकडून दगडफेक करून मोठय़ा प्रमाणात नासधूस करण्यात आली होती. यामध्ये भालकर यांचा मुलगा संजय जखमी झाला होता. त्यामुळे आजच्या निवडणुकीत काय होणार याकडे अवघ्या जिल्ह्य़ाचे लक्ष लागले होते.
आज ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला. राधिका खडके यांनी अर्ज दाखल केला. त्याला महाडिक गटाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला.त्यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र तो अमान्य केला गेला. या मुद्यावरून दोंन्ही गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. डके यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविल्याने महाडिक गटाचे सदस्य याचा निषेध करीत कार्यालयातूनबाहेर पडले. तर त्याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदी राधिका खडके यांची बिनविरोध निवड झाली. याची माहिती मिळताच दोंन्ही गटात वादावादी सुरू झाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतप्त जमावाकडून ग्रामपंचायतीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. याचवेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस व्हॅनवरही दगडफेक करून तिचे नुकसान केले. जमावाकडून बराच काळ दगडफेक होत राहिल्याने आजूबाजूच्या परिसरातही घरे, दुकाने यांच्या काचा फुटून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.इतक्यावरही जमाव शांत झाला नाही. सरपंच निवडीनंतर सत्तारूढ गटाचे सदस्य ग्रामपंचायत कार्यालयातून जल्लोष करीत बाहेर पडत होते. प्रतिस्पर्धी गटाने त्यांच्या दिशेनेही दगडफेक चालूच ठेवली.कांही क्षणापूर्वी अंगावर विजयाचा गुलाल पडलेल्या सरपंचासह अनेक सदस्यांच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे दिसू लागले. जमावाचा हिंसकपणा वाढत चालल्याने करवीरचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन व सहकाऱ्यांनी लाठीमार सुरू केला. लाठीचा जोरदार प्रसाद मिळू लागल्यावर जमाव तेथून पांगला. तरीही दिवसभर या भागात तणावाचे वातावरण होते.
पोलीस बंदोबस्तामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच दगडफेक व नासधूस करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
सरपंच निवडीनंतर सतेज पाटील, महादेवराव महाडिक या दोंन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात होते. पाटील गटाने खडके यांचा जातीचा दाखला वैध असल्याने त्यांची निवड योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. तर, धनंजय महाडिक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आणि पदाचा गैरवापर करून, लोकशाहीची थट्टा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला आहे. पाचगाव सरपंचपदाची निवडणूक बेकायदेशीर असल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाचगांव सरपंच निवडीच्या वेळी सतेज पाटील व महाडिक गटात चकमक
पाचगाव सरपंच पदाच्या निवडीतून गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक या काँग्रेसच्या दोन गटात धुमसत असलेल्या वादाचा शनिवारी स्फोट झाला.
First published on: 25-11-2012 at 01:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Group riot in sarpanch election