भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांची मुदत संपत आली, तसतशी पक्षातील गटबाजी आणखी तीव्र होताना दिसत आहे. प्रदेश कार्यालयाने दिलेल्या ‘चलो नागपूर’ अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार गोपीनाथ मुंडे समर्थक गटाचा एकही पदाधिकारी व कार्यकर्ता फिरकला नाही. पवार यांच्या नेतृत्वाखाली न जाता आम्ही थेट नागपूरला जाणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
वाढती महागाई, घोटाळे, एफडीआय आदी विषयांवरून नागपूर अधिवेशनाच्या काळात विधानभवनाला घेराव घालण्याचा कार्यक्रम भाजप प्रदेश शाखेने दिला आहे. त्यासाठी िपपरी-चिंचवडमधून तीन हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार असल्याचा दावा पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत या स्थानिक मागणीसह रास्त दरामध्ये १२ सिलिंडर मिळावेत, हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्याची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी व्हावी, धान्याला योग्य भाव मिळावा, दुष्काळग्रस्त भागात पाणी, चारा व रोजगाराची सरकारने हमी घ्यावी, भारनियमन रद्द करावे, वीज दरवाढ रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या असल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी सरचिटणीस प्रमोद निसळ व नामदेव ढाके उपस्थित होते.
एकनाथ पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे समर्थक आहेत. मुंडे समर्थकांचा त्यांना तीव्र विरोध असून अध्यक्षपदाच्या पूर्ण काळात पवारांनी तो अनुभवला आहे. आता मुदत संपताना मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्याचा प्रत्यय सोमवारी आला. पत्रकार परिषदेकडे कोणी फिरकले नाही. पवार व त्यांचे मोजके समर्थक या वेळी उपस्थित
होते.
याविषयी विचारणा केल्यानंतर पवारांनी कोणतेही भाष्य केले नाही. या वेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर टीका केली. ते केवळ घोषणा करतात. मात्र, कार्यवाही करत नाहीत. घरकुल योजनेत सत्ताधाऱ्यांनी सामान्यांची फसवणूक केली आहे, असे ते म्हणाले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groupinsum is also in for bjp chalo nagpur abhiyan