शहर कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस प्रभारींचा इशारा
पक्षातील नाराजांशी चर्चा करून त्यांना सन्मान दिला जाईल. पदाधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आजवर उपेक्षित राहिलेल्यांना संघटना वा शासकीय समित्यांमध्ये स्थान दिले जाईल. तथापि, पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसमध्ये गटबाजी व दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी श्यौराज वाल्मीकी यांनी येथे दिला. नाशिक शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात वाल्मीकी यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वेगळी मोट बांधून गटबाजी करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. काँग्रेस शहराध्यक्षांच्या विरोधात दोन ते तीन वर्षांपासून सक्रिय गटाने मेळाव्यापासून दूर राहात गटबाजी कायम असल्याचे दाखवून दिले. या गटाने वाल्मीकी यांची विश्रामगृहात भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडल्याचे सांगितले जाते. या निमित्ताने प्रभारींसमोर गटबाजीची अशी शोभा झाली.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, शहराध्यक्ष आकाश छाजेड, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे यांच्यासह इतर पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित होते. शहराध्यक्षपदी छाजेड यांची नियुक्ती झाल्यापासून नाराज असलेल्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, अण्णा पाटील आदींनी वर्षभरापासून काँग्रेस कार्यालयात फिरकणे टाळले आहे.
समांतर पद्धतीने पक्षाचे काम करणारे हे घटक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु छाजेड विरोधी गटातील एकही जण या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. याची पूर्वकल्पना असल्याने छाजेड यांनी शहराच्या तळागाळातून समर्थक जमा करून शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांचा हा मेळावा एखाद्या शेरो-शायरीची मैफल असावी अशा बाजात पार पडला. त्यास खुद्द वाल्मीकी यांनी सादर केलेले नानाविध शेर कारणीभूत ठरले.
मार्गदर्शन कमी आणि शेरो-शायरी अधिक असा एकंदर मेळाव्याचा नूर राहिल्याने सभागृहातील कोणी त्यांना फारसे मनावर घेतल्याचे दिसले नाही. वाल्मीकींच्या भाषणाकडे दुर्लक्ष करून बहुतेक कार्यकर्ते आपआपसात बोलण्यात दंग होते. प्रारंभी वाल्मीकी यांनी भाषण थांबवून गडबड बंद होण्याची दोन मिनिटे प्रतीक्षा केली, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने केलेल्या बलिदानाची गाथा सांगून वाल्मीकी यांनी दलित, शोषित, ओबीसी, व्यापारी, हिंदू, मुस्लीम अशा सर्व घटकांना सन्मान देणारा हा एकमेव पक्ष असल्याचे नमूद केले. राहुल गांधी गोरगरीब व अल्पसंख्याकांच्या थेट घरात जाऊन कुटुंबीयांची विचारपूस करतात. त्यांचे दु:ख जाणून घेतात.
पक्षात वेगवेगळ्या पदांवर काम करणारे पदाधिकारी वा लोकप्रतिनिधी या प्रकारे अल्पसंख्याकांच्या वस्ती वा घरात भेट देतात काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जो पदाधिकारी काम करणार नाही, त्याला त्या पदावर ठेवले जाणार नाही.
पक्षात दादागिरीचा कोणी प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत वेगवेगळ्या चुली मांडून पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना त्यांनी फटकारले. नाराजांशी चर्चा करून त्यांना पक्षात सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सूचित केले. आपआपसातील मतभेद मिटवून जातीवाद व धर्मवाद संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागावे, असे आवाहन वाल्मीकी यांनी केले.
वाहतुकीचे नियम कोणासाठी?
नियमांची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांकडून कशा प्रकारे भेदभाव केला जातो, याचे प्रत्यंतर गुरुवारी नाशिक येथील महात्मा गांधी रस्त्यावर आले. काँग्रेस भवनात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राचे प्रभारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिस्तीचे डोस पाजत असताना बाहेर त्यांची वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसत असूनही एकाही वाहनाविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस वाहतूक पोलिसांना झाले नाही. उलट अशा वाहनांमधील चालकांशी गप्पागोष्टी करण्यात त्यांनी आनंद मानला. विशेष म्हणजे नियम भंग करणाऱ्या वाहनांना ‘टो’ करून नेणारी वाहतूक पोलिसांची गाडीही या वेळी शांतपणे निघून गेली.
नाराज गटाची स्वतंत्र भेट
शहराध्यक्षांनी आयोजित मेळाव्यास उपस्थिती न दर्शविणाऱ्या छाजेड विरोधी गटाने विश्रामगृहात महाराष्ट्राचे प्रभारी श्यौराज वाल्मीकी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यात आ. निर्मला गावित, ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. ममता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, अण्णा पाटील, वंदना मनचंदा आदींसह काही नगरसेवकही उपस्थित होते. शहराध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे इच्छा असूनही पक्षाचे काम करण्यास मर्यादा येत असल्याची भावना संबंधितांनी वाल्मीकी यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते.