जिल्हा नियोजन मंडळाच्या (डिपीसी) प्रथमच झालेल्या निवडणुकीत, जिल्हा परिषद सदस्यांतून निवडून द्यायच्या मतदानाने सर्वच पक्षांतील गटबाजी उघड केली. त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसला. त्यांच्या उमेदवाराच्या पराभवास स्वपक्षीयच कारणीभूत ठरले. शिवसेनेचे सभापती बाबासाहेब तांबे व दत्तात्रेय सदाफुले हे दोन्ही उमेदवार विजयी झाले तरी या विजयातून पक्षांतर्गत मतभेदच स्पष्ट झाले. शिवसेनेचे बंडखोर तांबे यांनी पहिल्याच पसंतीची सर्वाधिक मते मिळवत अनेकांना झटका दिला. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
जिल्हा परिषद सदस्यांतून निवडून द्यायच्या ९ जागांसाठी आज झालेल्या मतमोजणीत तांबे (११ मते, सेना), बाबासाहेब दिघे (९, काँग्रेस), बाळासाहेब हराळ (९, काँग्रेस) व शरद नवले (८, राष्ट्रवादी) हे चौघे पहिल्याच फेरीत विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत आण्णासाहेब शेलार (६+२२, काँग्रेस), राजेंद्र फाळके (७+३, राष्ट्रवादी), दत्तात्रेय सदाफुले (६+३, सेना) व संभाजी दहातोंडे (५+४, राष्ट्रवादी) हे पाच उमेदवार विजयी झाले.
भाजपचे उमेदवार अशोक
अहुजा (४+३) यांना पराभवास सामोरे जावे लागले. शिर्डी परिषद मतदारसंघातून
निवडून द्यायच्या एका जागेवर सविता कोते (९, काँग्रेस) विजयी झाल्या. पराभूत उमेदवार आशा कोते
यांना (५, सेना) मते मिळाली.
मंडळावर निवडून द्यायच्या एकुण ४० जागांपैकी ३६ जागांसाठी निवडणूक होती, परंतु २६ जागांवर बिनविरोध निवड झाली. १० जागांसाठी निवडणूक होऊन काल मतदान झाले. त्यामुळे आता मंडळावरील ३६ जागांमध्ये राष्ट्रवादी १५, काँग्रेस १४, सेना ४, भाजप २ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल झाले आहे.
राष्ट्रवादीच्या जि. प.तील सत्तेला भाजप-सेनेने पाठिंबा दिला आहे. संख्याबळाप्रमाणे राष्ट्रवादीला १६, काँग्रेसला १२, भाजप-सेना प्रत्येकी २ व अपक्ष एक अशा जागा मिळणार होत्या. परंतु भाजप-सेनेने राष्ट्रवादीकडून आणखी प्रत्येकी एक वाढवून घेतली. तरीही शिवसेनेने तांबे की सदाफुले अशा घोळ घातला व अखेर दोघेही उमेदवार राहिले. नंतर सदाफुले यांची उमेदवारी अधिकृत ठरवली. निवडून येण्यासाठी सर्वच पक्षांनी मतांचा कोटा ठरवला होता. बंडखोर तांबे यांनी सर्वाधिक मते मिळवली. त्यांना राष्ट्रवादीने मदत केल्याची चर्चा आहे. तांबे यांच्या उमेदवारीस पारनेरचे आ. विजय औटी यांचा विरोध होता. तांबे यांच्या निवडीनंतर पारनेर तालुक्यात फटाके फोडण्यात आले.
भाजपच्या अंजली काकडे यांनी मतदान केले नाही. मात्र त्यांच्याशिवाय भाजपचे आणखी एक मत आहुजा यांना मिळाले नाही. या फुटलेल्या मतांवरुन भाजपमध्ये आता परस्परांवर आरोप होऊ लागले आहेत. काँग्रेसने ९ मतांचा कोटा ठरवला होता, परंतु शेलार यांना पहिल्या पसंतीची सहाच मते मिळाली. मतदानाच्या वेळीच हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी स्वतंत्र ‘फिल्डिंग’ लावत दुसऱ्या पसंतीच्या मतांची व्यवस्था केली. राष्ट्रवादीच्या मतांचा कोटा ८ होता, परंतु फाळके व दहातोंडे यांना पहिल्या पसंतीचे अनुक्रमे ७ व ५ मते मिळाली. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक असलेले अपक्ष विश्वनाथ कोरडे यांनाही पहिल्या पसंतीसाठी एक मत कमी पडले. ७५ पैकी जि. प. सदस्यांचे ७२ मतदान झाले होते, त्यामुळे निवडून येण्यासाठी ८ मतांची आवश्यकता होती. आहुजा यांनी एक मत मिळवले असते तर राष्ट्रवादीतील दहातोंडे यांची निवड बिकट झाली असती, अशी चर्चा होती.
अन्यथा वेगळी भूमिका घेऊ!
भाजपचे पराभूत उमेदवार अशोक आहुजा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, पक्षातीलच लोकांमुळे पराभव झाला हे उघड उघड सत्य आहे. पक्षाने मला उमेदवारी दिली होती, त्यामुळे माझा पराभव ही पक्षाचीच नाचक्की आहे, विजयासाठी पक्षाकडे मतांचा कोटा असूनही पराभव झाला हे दुर्दैव आहे. कोणामुळे पराभव झाला याचा अहवाल पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष, खा. दिलिप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, प्रताप ढाकणे यांना दिला जाईल. योग्य कारवाई होण्यासाठी चार दिवस वाट पाहू, दखल नाही घेतली तर वेगळी भूमिका जाहीर केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा