नैसर्गिक गर्भपाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामध्ये इतर कारणांसोबतच प्रदूषण हे महत्त्वाचे कारण असल्याचेही स्पष्ट होत आहेत. वाढत्या गर्भपातामुळे आरोग्य खात्यासोबतच सामाजिक विचारवंतांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
गर्भपात होणे आणि गर्भपात करणे या दोन्ही बाबी भिन्न आहेत. नैसर्गिकरीत्या होणाऱ्या गर्भपाताला वैद्यकीय भाषेत ‘मिस करेज’ असे तर कृत्रिमरीत्या होणाऱ्या गर्भपाताला ‘इनडय़ूस अॅबार्शन’ असे म्हणतात. २२ व्या आठवडय़ाच्या समाप्तीपूर्वी जर गर्भ गर्भाशयाच्या बाहेर पडला तर तो गर्भपात समजला जातो. तसेच २२ व्या आठवडय़ानंतर व ३७ आठवडय़ाच्या समाप्तीपूर्वी जर गर्भ बाहेर पडला तर त्यास गर्भपात न म्हणता काळपूर्व प्रसूती असे म्हटले जाते.
जनुकीय यंत्रणेतील बिघाड, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, संप्रेरकांचे असंतुलन, जंतूसंसर्ग, गर्भाशयातील विकृती, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव, खूप शारीरिक कष्ट, मानसिक ताण, मद्यपान, तंबाखूचे सेवन हे ‘नैसर्गिक गर्भपात’ होण्याची कारणे आहेत. स्त्री-बीज आणि शुक्राणू यांच्या संयोगाने तयार होणाऱ्या गर्भपेशीतच काही दोष निर्माण होतो. अशा गर्भाची योग्यप्रकारे वाढ न होता तो नाश पावतो. गर्भारपणात स्त्रीला आंत्यतिक मानसिक ताण पडणे, हे सुद्धा गर्भपाताचे प्रमुख कारण सांगितले जाते.
आजच्या काळात नैसर्गिक गर्भपात होण्याला प्रदूषण हे सुद्धा महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. ज्या भागात औद्योगिकरण अधिक आहे, तेथे याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. कारण या भागात धुराच्या माध्यमातून शिसा वातावरणात पसरतो.
तो दूषित वातावरणातून अन्नामध्ये आणि अन्नामधून पोटामध्ये जातो. त्याचा परिणाम गर्भाशयातील गर्भावर होऊन त्यात विकृती निर्माण होते. चांगले ते धारण करणे हा निसर्गाचा नियम आहे. विकृती निर्माण झाल्याने नैसर्गिकरीत्या असा गर्भ बाहेर फेकला जातो. प्रदूषणातून गर्भपात होण्याच निश्चित प्रमाण सांगणे शक्य नसले तरी एकूण गर्भपाताच्या पन्नास टक्के गर्भपात हे प्रदूषणामुळे होत असावे, असे अंदाज लता मेडिकल रिसर्च फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. अर्चना पटेल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. शिसाची बाधा झालेले मूल जन्मले तर त्याच्या मेंदू, मूत्रपिंड आणि फुफ्फुसावर परिणाम होतो. अशा मुलांचा बुद्यांक कमी असतो. पुढे या मुलांमुळे त्यांच्या पालकांना मानसिक त्रास होतो, असे संशोधनांती स्पष्ट झाले आहे. शिसामुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे त्याच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली असल्याचे त्या म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा