‘युतीचे नगरसेवक महापालिकेत येऊन बोहनीची वाट पाहतात’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोंबणाऱ्या टीकेला शिवसेनेनेही ‘स्थायी समिती ८ सदस्यांची करून वर्षभराची बोहनी कशी केली’ असे बोचरे प्रत्युत्तर दिले आहे. ‘खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे’ अशी राष्ट्रवादीची संभावना करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर संग्राम जगताप यांनी मनपातील सत्ताधारी युतीचे नगरसेवक रोज मनपा कार्यालयात येऊन बोहनीची वाट पाहतात अशी टीका केली होती. शिवसेनेला ही टीका चांगलीच लागली असून शहरप्रमुख संभाजी कदम यांनी त्यामुळे लगेचच राष्ट्रवादीला त्यांच्या सत्ताकाळाची आठवण देत सुनावले आहे.
स्थायी समिती ८ सदस्यांची करून वर्षभर राष्ट्रवादीने केलेली बोहनी जनता विसरलेली नाही. निविदा पेटी पळवणे, जकातीचा ठेका एकदा नाही तर दोन वेळा कमी करून मनपाचे तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान करणे हे सगळे प्रताप जगताप महापौर असतानाच झालेले आहे हे नगरकरांना चांगलेच माहिती असल्याने माजी महापौरांनी उगीचच बेताल वक्तव्ये करू नयेत असे कदम यांनी म्हटले आहे.
त्यामुळे समाजसेवेचे खऱ्या अर्थाने काम हे युतीच्या काळातच होत आहे, युतीच्या महापौर शीला शिंदे यांनी प्रयत्नपूर्वक रमाई आवास योजना तसेच अन्य योजनांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी सरकारकडून आणला आहे, याची माहिती माजी महापौरांनी घ्यावी असेही कदम यांनी म्हटले आहे.

Story img Loader