शेतकऱ्यांप्रती शासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत भाजप-शिवसेनेच्या आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी बुधवारी खरीप आढावा बैठकीत घोषणा देऊन गोंधळ घालीत पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांची गाडी अडवून धरले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धावपळ उडाली होती.
नागपूर जिल्ह्य़ातील खरीप आढावा बैठकीला अखेर बुधवारी मुहूर्त सापडला. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही यंदा आढावा बैठकीला उशीर झाला. या महिन्याच्या प्रारंभी बैठक होणार होती. अधिकारीही हजर होते. मात्र, ऐनवेळी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यवतमाळला निघून गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. ती आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात सकाळी सुरू झाली. बैठकीचे कामकाज सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोरमारे, सुधीर पारवे, शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल व इतर लोकप्रतिनिधींनी घोषणा देणे सुरू केले.
घोषणा देत त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठकीचे कमकाज काहीवेळ थांबले. घोषणा देत भाजप-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीवर बहिष्कार घातला.  
बैठकीचे कामकाज आटोपून पालकमंत्री शिवाजीराव मोघे बाहेर आले आणि कारमध्ये बसून निघत असतानाच आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोरमारे, सुधीर पारवे, शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले व इतर लोकप्रतिनिधींनी त्यांचे वाहन अडविले. वाहनावर ठिय्या देत घोषणा दिल्या. काहीवेळ पालकमंत्री गाडीत बसून राहिले. त्यानंतर ते बाहेर आले आणि या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.
 नागपूर जिल्ह्य़ात गेल्यावर्षी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. बँका पीक कर्ज देत नाही. शेतकरी पिचला जात असून शासन मात्र दरवर्षी खरीप आढावा घेते. या आढाव्याला अर्थच काय उरतो, असा सवाल या लोकप्रतिनिधींनी केला.
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली नाही तर १ जून पासून जिल्ह्य़ात आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. ३ जूनला शासनाची बैठक असून त्यात ही समस्या मांडण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्यानंतरच या लोकप्रतिनिधींनी त्यांना सोडले.
बघ्यांची गर्दी
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ उडाली. जिल्हाधिकारी, इतर अधिकारी समजावण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र, आंदोलनकर्ते त्याकडे लक्षच देत नव्हते. आंदोलन सुरू झाल्यानंतर बऱ्याचवेळाने मोठय़ा वाहनातून पोलीस आले. जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेले लोकही तेथे गोळा झाल्याने बऱ्यापैकी गर्दी झाली होती.

Story img Loader