आई-वडिलांनी मुलांशी मैत्रीचा मार्ग न स्वीकारल्यास मुले इंटरनेट व मोबाइलमधील वाईट सवयींच्या आहारी जातील अशी भीती व्यक्त करताना, पालकांनी मुलांशी मैत्रीच्या नात्यातून जगायला शिकले पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सविता मोहिते यांनी केले.  
कराड येथील सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज महिलांनी आयोजित केलेल्या जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. साधना मोहळकर, आशाताई कुंदप, सविता हेडे, सुवर्ण रांगोळे, सुनेत्रा कासार, नंदा कुंदप, हेमा खुटाळे, ज्योत्स्ना खुटाळे, रेखा झुटिंग यांची उपस्थिती होती.
डॉ. मोहिते म्हणाल्या, की आई-वडिलांनी मुलांचे रोल मॉडेल बनले पाहिजे. अभ्यासासाठी घरातील वातावरण न बदलता मैत्रिपूर्ण व्यवहार राहिल्यास अनुचित प्रकार घडणार नाहीत. सामाजिक प्रदूषण होत असताना समाज कुठे चालला आहे याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. महिलांनी एकत्रित येणे सोपे असते. त्या मानाने एकत्रित राहणे अवघड असते. अंगभूत कौशल्याचा महिलांना प्रगतीसाठी उपयोग करता आला पाहिजे. सामाजिक प्रदूषण होत असताना समाज आणि कुटुंब या दोन्ही घटकांतील विकास समप्रमाणात झाला पाहिजे. नवीन पिढीचे भवितव्य व जागतिकीकरण यामधील समतोल राखण्याची कसोटी लागली आहे. याच अनुषंगाने किशोरवयीन मुलांच्या मनातील गोंधळ जाणून घेताना त्यांच्यातील मैत्री आणि परिपक्वता टिकवण्याची जबाबदारीही वाटते.
डॉ. साधना मोहोळकर, आशाताई कुंदप, सविता हेडे यांनी मनोगत व्यक्त केले. सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Story img Loader