दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या निमित्ताने जीवन विकास न्यासतर्फे नववर्षांच्या स्वागतासाठी २१ मार्च रोजी यात्रा काढण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात अभिनेते आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. सिडको, इंदिरानगर, राजीवनगर येथे नववर्ष स्वागतयात्रेचे कार्यकर्ते विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळे आणि नागरिकांशी चर्चा करणार आहेत, तर १९ व २० मार्च रोजी अभिनेते चिन्मय उदगीरकर हेही भेट देणार आहेत.
एका तपापासून जीवन विकास न्यास नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात शोभायात्रांचे आयोजन करत आहे. स्वागतयात्रांच्या या उपक्रमांमुळे ठाणे, डोंबिवली, पुणे, कोल्हापूर या शहरांच्या पंक्तीत नाशिक जाऊन बसले आहे. या स्वागतयात्रेत पारंपरिक वेशभूषेत सर्वच जण सहभाग घेतात. स्वागतयात्रांद्वारे संस्कृतीच्या जपवणुकीचा प्रयत्न होत असल्याने तसेच या यात्रांमध्ये कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी, धांगडधिंगा यांना थारा नसल्याने बिनधास्तपणे सहकुटुंब सामील होणाऱ्यांची संख्या अधिक असते. या यात्रांमुळे नाशिकची सांस्कृतिक उंची वाढविण्यास मदतच झाली आहे. विशेष म्हणजे कोणतीही एक भव्य स्वागतयात्रा न काढता त्या त्या परिसरातील विविध ठिकाणांहून यात्रांना सुरुवात होते. त्यामुळे त्या त्या भागातील आबालवृद्धांसह सर्वाना यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळते. सर्व यात्रा एका चौकामध्ये एकत्र आल्यानंतर आपल्या परंपरा व सामाजिक जाणीव या विषयांवर ४० मिनिटे बोधपर मार्गदर्शन होऊन यात्रेचा समारोप होतो. यात्रामार्गावर रांगोळ्या व गुढी उभारण्यात येतात. स्वागतयात्रा समितीने आपले कार्य केवळ यात्रा काढण्यापुरते मर्यादित ठेवलेले नाही, तर यानिमित्ताने सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. २०१२ मध्ये बेटी बचाव, २०१३ पाणीबचत, २०१४ मतदार जागृती यांसारखे सामाजिक जागृती अभियान राबविले गेले. यंदा ‘स्वच्छ नाशिक-स्वच्छ भारत’ अभियानाद्वारे जनजागृती करण्याचे ठरविले आहे.
यंदा स्वागतयात्रेची सुरुवात विविध २५ ठिकाणांहून शनिवारी सकाळी ६.२६ वाजता होणार आहे. स्वागतयात्रेच्या या उपक्रमासाठी ठाणे जनता सहकारी बँक व टकले ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे. यंदाच्या स्वागतयात्रेत इंदिरानगर परिसरातील ५० महिला दुचाकीवर स्वार होऊन सामील होणार असल्याने यात्रेचे ते एक वैशिष्टय़ ठरणार आहे. शहरातील सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा आढावा घेऊन दोन संस्थांना २१ हजार रुपये व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय शहरासाठी भूषणावह अशा व्यक्तींनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
अशा व्यक्ती व संस्थांची नावे नाशिककरांनी सुचविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. याआधी किरण चव्हाण, नेमीचंद पोद्दार, डिसुझा, विकास व विद्या मोकुणे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, शेखर गायकवाड, विनायक रानडे, सुहासिनी कुलकर्णी, उज्ज्वल व सतीश जगताप यांना सन्मानित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष विराज लोमटे यांच्याशी ९४२२७५८१४२ संपर्क साधावा.
नववर्ष स्वागतयात्रांच्या तयारीस आजपासून सुरुवात
दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या निमित्ताने जीवन विकास न्यासतर्फे नववर्षांच्या स्वागतासाठी २१ मार्च रोजी यात्रा काढण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात अभिनेते आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १८
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2015 at 07:47 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa celebration in nashik