बजरंग दल, दुर्गा वाहिनी, भाजयुमो, विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटनेच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त श्रीरामाच्या जयघोषाने नगरी दुमदुमली. गुढीपाडवा, नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शोभायात्रेचा शुभारंभ सिव्हिल लाईनमधील हनुमान मंदिरातून करण्यात आला. या शोभायात्रेत श्रीरामाच्या विशाल मूर्तीसह विविध देखावेसुद्धा काढण्यात आले. शोभायात्रा दुर्गा चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकीज चौक, गांधी प्रतिमा, चांदणी चौक, सिंधी कॉलनी, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक परिसरातून फिरून नेहरू चौकात श्रीरामाच्या विशाल मूर्तीची स्थापना करण्यात आली. या शोभायात्रेत श्रीरामाचे रथ, राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे देखावे, नऊ देवी, वानर व भारतमातेची प्रतिमा आकर्षणाचे केंद्र ठरले होते. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्याबरोबरच ऐतिहासिक, पुराणकालीन प्रसंगावर देखावे तयार करण्यात आले होते. या शोभायात्रेत तरुणांचे भगवे ध्वजपथक, अश्वपथक, डिजेच्या तालावर नाचणाऱ्या युवा पिढीने शहर भगवामय झाले होते. शोभायात्रेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून नववर्षांचे जोरदार स्वागत केले.
दरम्यान, गोंदिया नगर सिंधी समाज, सिंधी सेवादारी मंडळ, सिंधी नवयुवक सेवा मंडळ व सिंधी बांधवांच्या वतीने चेट्रीचंड महोत्सव उत्साहात पार पडला. यादरम्यान भव्य शोभायात्रा, आतषबाजी करून उत्सव साजरा केला.
यानिमित्त सर्व सिंधी बांधवांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवल्याने सुटीचे वातावरण निर्माण झाले होते व यामुळे समाजाची एकता दिसून आली. सकाळी नऊ वाजता प्रेमप्रकाश आश्रम (बाराखोली) येथे अखंड ज्योतीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बहिराणा साहेब यांची शोभायात्रेला सिंधी नवयुवक सेवा मंडळाच्या अध्यक्षांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दरम्यान, शहरातील गंज बाजार, कपडा लाईन, मनिहारी धर्मशाळा येथे महाप्रसाद वितरण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता मंडळाचे साजनदास माधवानी, हिरानंद गुरुनानी, गोपी थावानी, नानकराम अनवानी, इंद्रकुमार दुसेजा, कमल रामानी, चंद्रसेन रामनानी, कमल लालवानी, मनोहर मेघानी, संजय आहुजा, सेवकराम प्रथ्यानी, भगत ठकरानी, रोचीराम ठकरानी, रवी आर्य आदींच्या उपस्थितीत शहरातील मुख्य मार्गाने चेट्रीचंड महोत्सव शोभायात्रा काढण्यात आली.  विविध सामाजिक संघटना व व्यापारी संघटनेकडून नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, मिठाई व अल्पोहाराची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.