निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे जो ‘रनरेट’ चांगला राखू शकेल, अशा व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी निवड व्हावी. केवळ प्रादेशिकता हा निकष न ठेवता क्षमता असणाऱ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी असावी, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
काँगेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचे हे वक्तव्य भुवया उंचवायला लावणारे आहे. या पदासाठी चव्हाण यांच्या नावाचाही विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, नाव चर्चेत असल्याविषयी काहीच माहीत नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मराठवाडय़ात ४६ पकी १९ आमदार काँग्रेसचे आहेत. नांदेड व लातूर जिल्ह्यांत काँग्रेस आमदारांची संख्या अधिक आहे. मात्र, मराठवाडय़ात काँग्रेस पक्ष संघटनेची वीण उसवल्यासारखे चित्र आहे. मराठवाडय़ाच्या वाटय़ाला दोन वेळा मुख्यमंत्रिपद आले. पण या विभागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. मित्रपक्षापेक्षा अधिक आमदार असतानाही मंत्रिमंडळात राजेंद्र दर्डा व मधुकरराव चव्हाण हे दोघेच कॅबिनेटमंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपद मराठवाडय़ातील नेत्याकडे द्यावे, अशी मागणी काहीजणांनी लेखी स्वरूपात नोंदवली आहे. या अनुषंगाने अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, असा प्रादेशिक निकष ठेवून चालणार नाही, तर सक्षम माणूस या पदासाठी गरजेचा आहे. आता निवडणुकीच्या तयारीसाठी कमी कालावधी आहे. त्यामुळे अधिक ‘रनरेट’ ठेवू शकेल, असा माणूस हवा. शेवटी जागा निवडून आणणे महत्त्वाचे आहेच.
मराठवाडय़ासह राज्यात भाषणांचा फड गाजवतील असे नेते काँग्रेसमध्ये फारसे दिसत नाहीत. पक्षीय पातळीवर मतदारसंघाबाहेर लक्ष घालणारे नेते दिसत नाहीत, या अनुषंगाने बोलताना चव्हाण म्हणाले की, पक्षाकडे अशा व्यक्ती आहेत. पण त्यांना संधी द्यायला हवी. प्रत्येक जिल्ह्याची स्थिती निराळी आहे. तेथील जिल्हाध्यक्ष व नेत्यांनी लक्ष घालायला हवे. माझ्यासारख्या व्यक्तीने त्यांना मदत करावी, अशीच भूमिका आहे. मात्र, या निर्णय प्रक्रियेत नसल्याने मतदारसंघाबाहेर लक्ष देत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असल्याबाबत विचारले असता ‘मी कधीच पद मागितले नाही. नाव चच्रेत असल्याचे वर्तमानपत्रात वाचले. या बाबत काहीच माहीत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘एमआयएम’चा परिणाम होईल
मजलिस इत्तेहादुल मुसलमीन, अर्थात ‘एमआयएम’ पक्षाचा लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला फटका बसू शकतो. त्यामुळे अल्पसंख्य समाजात काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांवर बरेच काही अवलंबून असेल. हुसेन दलवाई, नसीम खान, अब्दुल सत्तार ही काँग्रेसमधील नेतेमंडळी काँग्रेसची भूमिका किती व्यवस्थित मांडतात, यावर बरेच काही अवलंबून आहे, असेही चव्हाण म्हणाले. नांदेड महापालिकेत असदुद्दीन ओवीसी यांच्या नेतृत्वाखाली ११ नगरसेवक निवडून आले आहेत. या पाश्र्वभूमीवर येत्या निवडणुकीत या पक्षाचा परिणाम काँग्रेसवर होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी मान्य केले. हा पक्ष मुस्लिम लीगसारखे काम करतो आहे. प्रक्षोभक भाषणांमुळे धार्मिक भावनांना खतपाणी घालणारे कार्यकत्रे असल्याने आमच्या नेत्यांना चांगला प्रचार करावा लागणार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
चव्हाणांची ख्याती चांगल्या कामाचीच!
मुख्यमंत्रिपद भूषविले असल्याने ‘दोन चव्हाणांच्या कार्यशैलीत काही फरक दिसतो का,’ असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले की, चव्हाणांच्या कामाची ख्याती आहेच! मग ते चव्हाण कोणतेही असो. त्यांचे काम चांगले आहेच, त्यांना पूर्ण सहकार्यही आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.