महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी आणि पालकांना पुढील शैक्षणिक वर्षांसाठी अभ्यासक्रम निवडण्यासंदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नाशिकरोड येथील विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था या शासकीय कार्यालयाच्या वतीने मानसशास्त्रीय कसोटय़ांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत विशेष मोहीम आयोजित केली जाणार आहे.
दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर एक वेगळेच शैक्षणिक विश्व खुले असते. या विश्वात प्रवेश करताना गोंधळ होऊ नये म्हणून योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक असते. शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थी साशंक असतात. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाची इत्थंभूत माहिती देणे आवश्यक असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, अभिवृत्ती, अभिरुची, व्यक्तिमत्त्व आणि कौटुंबिक पाश्र्वभूमी या सर्व बाबी अभ्यासक्रम निवडताना विचारात घेणे अत्यावश्यक असते. या सर्व बाबींचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि कल लक्षात घेऊन नाशिकरोड येथील विभागीय महसूल कार्यालय परिसरातील विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था (शासकीय बंगला क्र. १७ व १८) या शासकीय कार्यालयामार्फत दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोटय़ांचे आयोजन करून त्याआधारे योग्य अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन करण्यात येते.
१ एप्रिलपासून ही विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असून मानसशास्त्रीय कसोटय़ांद्वारे करिअरबाबत समुपदेशन करण्यात येईल. गरजू विद्यार्थी व पालकांनी या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी ‘विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, नाशिक विभाग, नाशिक महसूल आयुक्त कार्यालय परिसर, शासकीय बंगला क्र. १७ व १८, नाशिकरोड, नाशिक’ या पत्त्यावर पत्राद्वारे किंवा समक्ष संपर्क साधून नावनोंदणी करावी. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या दिनांकास मानसशास्त्रीय चाचणी आणि समुपदेशनासाठी स्वखर्चाने उपस्थित राहण्याचे बंधनकारक राहील. या कार्यालयाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे येतात. या चारही जिल्ह्यांत मार्गदर्शनाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी व पालकांनी जिल्हानिहाय संपर्क पत्त्यावर नावनोंदणी केली तरी चालू शकेल. त्याकरिता नाशिकसाठी एस. एल. अहिरराव (९४२३२३१५६६), जळगावसाठी किशोर राजे (९४२१५२११५६), धुळ्यासाठी नंदकिशोर बागूल (९४२०८५२५३१) आणि नंदुरबारसाठी राजेंद्र माळी (९४२३१९४२१२) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader