लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून गुजरातच्या विकासाचे रंगविले जाणारे चित्र दिशाभूल करणारे आहे, अशी टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या अंबरनाथ येथील प्रचारसभेत बोलताना केली.
विकासाचे मापन करणाऱ्या सर्व मापदंडामध्ये गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे. महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक . ५७२ तर गुजरातचा . ५२७ आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८३ टक्के तर गुजरातमधील ७९ टक्के नागरिक साक्षर आहेत. महाराष्ट्रातील ९ हजार ९११ निर्मल गावांच्या तुलनेत गुजरातमधील निर्मल गावांची संख्या अवघी २,१०० आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १ लाख ६० हजार तर गुजरातचे अवघे ८९ हजार रुपये आहे. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक २ लाख ८६ हजार कोटी तर गुजरातमधील गुंतवणूक अवघी ५६ हजार कोटी रुपये आहे. गुजरातमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या खासदाराला जिवंत जाळले जाते.
निष्पक्षपाती सुनावणीसाठी अहमदाबादमधील खटले मुंबईच्या न्यायालयात आणावे लागतात. त्यामुळे अशा या गुजरातने महाराष्ट्राला विकासाचे धडे देण्याची आवश्यकता नाही. पुरोगामी महाराष्ट्रास महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या गुजरातविषयी आदर आहे. जातीयवादी नरेंद्र मोदींविषयी नाही. खरे तर गुजरात पॅटर्नच्या नावाखाली देशात पुन्हा फॅसिस्ट प्रवृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत असून महाराष्ट्रातील पुरोगामी जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन शरद पवार यांनी पुरोगामी महाराष्ट्राची शान राखली, मात्र युतीच्या गोटात शिरलेल्या रामदास आठवलेंना त्याचा विसर पडला अशी टिप्पणी करीत आर.आर. पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत शिवसेना आणि मनसेच्या धोरणांचीही चिरफाड केली. खासदार आनंद परांजपे, आमदार किसन कथोरे यांचीही या सभेत भाषणे झाली.  
आचारसंहितेचा अतिरेक
प्रचारसभेआधी पत्रकार परिषदेत बोलताना आर.आर.पाटील यांनी सध्या आचारसंहितेचा अतिरेक होत असून त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत असल्याचे मत व्यक्त केले.      

Story img Loader