‘दिवाळीचा सण तोंडावर आलाय. वर्षांत बरकत देणारा हा मोठा सण. लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात झाल्या. त्या वेळी सण, उत्सव नव्हते. मुलांच्या परीक्षा तर झाल्याच होत्या, शिवाय आमच्या नरेंद्रभाईंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे काम-धंदे सोडून निवडणूक प्रचारात जोमाने उतरलो. विधानसभा निवडणूक मात्र ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आली आहे. धंद्याचा हंगाम आहे. कोणी पण निवडून या. ‘आम्हाला आता वेळ नाही’ (अत्यरे टाइम नथी, काम छे), अशा प्रतिक्रिया ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतील गुजराती व्यापारी व्यक्त करू लागले आहेत.
मोदींच्या प्रचारसभांना जाऊ, त्यांना पाहू. पण धंद्याची वेळ सोडून प्रचारासाठी वेळ खर्ची घालणे आता जमायचे नाही, असेही काहींनी सांगितले. मुंबईप्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवलीत गुजराती, मारवाडी, कच्छी समाज मोठय़ा संख्येने राहतो. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात तर या समाजाची मोठी ‘व्होटबँक’ आहे. मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना कृषिमालाचा पुरवठा करणाऱ्या एपीएमसी बाजारपेठा नवी मुंबईच्या दिशेने सरकताच येथील मसाला, धान्य बाजारात काम करणारे गुजराती व्यापारी मोठय़ा संख्येने ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या दिशेने सरकले. हजारोंच्या संख्येने असलेली ही मंडळी आता या भागातील निर्णायक मतदार मानले जातात.
लोकसभेत जय श्रीकृष्ण
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्रभाई पंतप्रधान व्हावेत यासाठी गुजराथी बांधव ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत हिरिरीने प्रचारात उतरले. नवी मुंबईसारख्या उपनगरात मोठय़ा संख्येने वास्तव्यास असलेला गुजराती समाज वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्यासोबत राहिलेला. लोकसभा निवडणुकीत मात्र गुजरातीबहुल वस्त्यांमधून नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसले. नरेंद्रभाई पंतप्रधान व्हावेत म्हणून लोकसभा निवडणुकीत गल्लीबोळात ही मंडळी प्रचार करताना दिसायची. ठाण्यात तर युतीच्या प्रचारासाठी काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याची उदाहरणे पुढे आली. जवाहिर, कपडा, किराणा मालाच्या घाऊक व्यापाऱ्यांनी नरेंद्रभाईंसाठी तन, मन, धन लावून काम केले. विधानसभा निवडणुकीत मात्र हा व्यापारी वर्ग फारसा सक्रिय झाल्याचे चित्र अपवादानेच दिसू लागले आहे.
भाईसाब धंदे का टाइम है..
ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतील काही गुजराथी व्यापाऱ्यांशी तसेच संस्थांच्या प्रतिनिधींशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ‘साहब ये धंदे का टाइम है’, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘विधानसभा निवडणुकीत आम्हाला फारसा रस नाही. आम्ही मतदान करू, पण नरेंद्रभाईंची बात कुछ और थी. या वेळी दिवाळीचा हंगाम आहे. मालाची निर्मिती, आयात करणे, तो गोदामात भरणे, तेथून गरजेप्रमाणे दुकानात आणणे अशी भरपूर कामे आमच्यापुढे आहेत. दिवाळी-दसऱ्याला धंदा नाही केला तर मग कधी करायचा. आम्ही मतदानाला जरूर बाहेर पडू. नरेंद्रभाई पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही जसा कामधंदा सोडून काम करीत होतो, तसे काम करणे आता शक्य नाही, अशा प्रतिक्रिया गुजराती व्यापाऱ्यांनी वृत्तान्तला दिली.
ठाणे, डोंबिवलीतील मोजके स्थानिक व्यापारी सोडले तर काही व्यापारी मुलुंड, घाटकोपर, अंधेरी परिसरातून व्यवसायासाठी शहरात येतात. व्यापाऱ्यांमधील काही गुजराती मतदार हा मूळचा डोंबिवलीचा मतदार नाही. ते अन्य शहरांतील मतदार आहेत. अनेक गुजराती बांधवांच्या एमआयडीसीत लहानमोठय़ा कंपन्या आहेत. त्यांना पण उद्योग-व्यवसाय सोडून निवडणुकीच्या मागे पळणे शक्य नाही, अशा प्रतिक्रिया उद्योजकांनी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा