ठाणे पोलिसांच्या हद्दीतील मुंब्रा आणि देसाई गावातील गावठी दारूच्या गुत्त्यांनी आता महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील पालघर, डहाणू, वसई यांसारख्या पट्टय़ात आपले बस्तान बसविले असून मालाड येथील दारूकांडामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी या भागातील गावपाडय़ांमधील अड्डय़ांची शोधाशोध सुरू केली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातमधून सीमेवरील ग्रामीण भागात दररोज लाखो लिटर गावठी दारूची आयात होत असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली असून वसई पट्टय़ात या अड्डय़ांनी गेल्या काही वर्षांत चांगलेच बाळसे धरले आहे. विशेष म्हणजे, या दारूची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ठरावीक मोटारसायकलच्या इंधनाच्या टाकीत विशिष्ट बदल केले जात असल्याचे उघड होत असून इंधनाच्या टाकीतून शेकडो लिटर दारू ठाणे, दिवा पट्टय़ात येत असल्याचे उघड होऊ लागले आहे.
ऐरोली परिसरात काही वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडात ३२ जणांना प्राण गमवावे लागले होते. या सगळ्या पट्टय़ात मुंब्रा, देसाई गाव, उरणलगत असलेल्या धुतूम परिसरातून गावठी दारूचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले होते. वारंवार होणाऱ्या दारूकांडामुळे तत्कालीन सरकारने ठाणे जिल्हय़ातील दिवा, देसाई, मुंब्रा परिसरांतील दारूचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या भागातील दारूचे अड्डे बऱ्यापैकी कमी झाल्याचे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी उरण, मुंब्रा आणि देसाई गावातील गावठी
* मोटारसायकलच्या टाकीतून दारूची विक्री
काही दशकांपूर्वी गावठी दारूची वाहतूक हमालांमार्फत व्हायची. टायरच्या टय़ूबमध्ये गावठी दारू भरून त्या टय़ूब गोणी भरल्या जायच्या. मग, हमाल या गोणीद्वारे विविध गुत्त्यांवर गावठी दारू वितरित करायचे. कालांतराने गावठी दारूच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनांचा वापर होऊ लागला. कारच्या मोकळ्या जागेमध्ये दारूसाठय़ाकरिता विशिष्ट बदल करण्यात येत होते आणि त्याद्वारे गावठी दारू वितरित होत असते. मात्र, पोलिसांच्या कारवाईमध्ये अनेकदा दारूमाफियांच्या वाहतुकीचे बिंग फुटले आणि त्यामुळे चारचाकी वाहनाद्वारे होणारी दारूची वाहतूक दारूमाफियांसाठी डोकेदुखी ठरू लागली. यामुळे दारूमाफियांनी आता दारू वाहतुकीसाठी नवा फंडा शोधून काढला असून या फंडय़ानुसार दारू वाहतुकीसाठी मोटारसायकलींचा वापर करण्यात येत आहे. दारूच्या वाहतुकीदरम्यान पोलिसांच्या जाळ्यात सापडू नये म्हणून माफियांनी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीमध्ये दारूचा साठा ठेवण्याकरिता विशिष्ट बदल केले आहेत. याच मोटारसायकलीद्वारे मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये हातभट्टीच्या गावठी दारूची वाहतूक होत आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दारूची वाहतूक करणाऱ्या एक मोटारसायकल ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली होती. त्या मोटारसायकलमध्ये दारूसाठय़ाकरिता विशिष्ट टाकी बनविण्यात आल्याचे उघड झाले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दारूविक्रेत्यांनी आता वसई, पालघर पट्टय़ात बस्तान बसविले असून गुजरातच्या सीमावर्ती भागातून या भागात होणाऱ्या दारूच्या वाहतुकीमुळे स्थानिक पोलीस अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच भागातून मोटारसायकल किंवा रेल्वेमार्गे या दारूची वाहतूक होत असून या वाहतुकीदरम्यान कुणालाही संशय येऊ नये म्हणून काही मोटारसायलींमधून विशिष्ट पद्धतीच्या ‘सॅक’चा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
देसाई, दिवा, मुंब्रा पट्टय़ातून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांत एके काळी बोटीने गावठी दारूची वाहतूक होत असे. मात्र, ऐरोली आणि विक्रोळीतील विषारी दारूकांडानंतर देसाईगाव आणि उरण भागातील हातभट्टय़ांवर पोलिसांकडून कारवाई होऊ लागली. त्यामुळे या भागात हातभट्टय़ांचे प्रमाण पूर्वीइतके राहिले नसले तरी गेल्या आठवडय़ात ठाणे पोलिसांनी शीळ-डायघर येथील देसाई गावातील खाडी किनाऱ्यापासून एक ते दीड किलोमीटर आतील पात्रात गावठी दारूनिर्मितीची भट्टी उद्ध्वस्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भागातील दारूमाफियांनी आता वसई आणि पालघर पट्टय़ात बस्तान बसविल्याची माहिती पोलिसांकडे असून मालाड दारूकांडानंतर पोलिसांनी पश्चिम पट्टय़ात शोधमोहीम हाती घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा