जळगाव घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांना आता तुरूंगात घरचे जेवण मिळणार आहे. त्यांच्यासाठी काही अटी-शर्तीवर घरचे जेवण देण्यास येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. तसेच आ. सुरेश जैन यांच्या प्रकृतीची तपासणी व अन्य बाबींवर २४ जानेवारीला सरकार पक्ष बाजू मांडू शकेल. आ. जैन यांच्यावर उपचार करणाऱ्या सेंट जॉर्ज रुग्णालयालाही कागदपत्र सादर करण्यासाठी न्यायालय स्मरणपत्र पाठविणार आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार संशयित आ. जैन यांच्यासह या खटल्यातील ५१ पैकी ४९ संशयितांना येथील विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर हजर करण्यात येवून सुनावणी झाली.
जळगांव नगरपालिकेच्या घरकुल योजनेतील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याच्या खटल्याचे कामकाज आता जळगाव ऐवजी धुळे येथील विशेष न्यायाधीश कदम यांच्यासमोर सुरू झाले आहे. १६ जानेवारी रोजी आ. जैन यांना धुळे जिल्हा कारागृहात आणण्यात आले. माजी पालकमंत्री देवकर, माजी महापौर प्रदीप रायसोनी, राजा मयुर, नाना वाणी यांच्यासह धुळे कारागृहातील पाचही संशयितांना शुक्रवारी धुळे न्यायालयात हजर करण्यात आले.
आ. जैन यांच्यासह धुळे कारागृहातील पाचही संशयित वगळता यापूर्वी जामीन मंजूर झालेल्या संशयितांसाठी २४ फेब्रुवारी तारीख देण्यात आली. आ. जैन यांनी न्यायालयाकडे एका पत्राद्वारे वैद्यकीय सुविधा आणि मधुमेह तसेच हृदयाच्या चाचण्या करून घेण्यासंदर्भात विनंती अर्ज सादर केला. त्यावर २४ जानेवारी रोजी सरकार पक्ष आपली बाजू
मांडणार आहे.
विशेष सरकारी वकिल निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केलेल्या मागणीनुसार आ. जैन यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात झालेल्या उपचाराचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेले नाहीत. अहवाल सादर करावेत असे आदेश न्यायालयाने दिले. संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने ‘सीसी टीव्ही’ बाबत पत्र देवून सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण केवळ सात दिवस साठविता येते असे सांगत ते दीर्घकाळ साठविले जात नाही असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आर्थर रोड तुरूंग आणि सेंट जॉर्ज रुग्णालय यांच्या दरम्यान आ. जैन यांच्यावरील उपचाराबाबत झालेल्या पत्रव्यवहारासह इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी रुग्णालयास स्मरणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, देवकर यांचा जामीन औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आणि त्यांना अटक करून घेणे भाग पडले. या संदर्भात त्रयस्थ म्हणून नितीन चौधरी आणि छगन पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली. या अर्जावर २४ जानेवारी रोजी सुनावणी होईल.

Story img Loader