पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या मारामारीचे पर्यवसान जवळील रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या झाडण्यात आले. यातील गोळी लागून एकजण जखमी झाला. औरंगाबादच्या हर्सूल भागातील ऑडीटर सोसायटीत मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे थरारनाटय़ घटले. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. सिडको पोलिसांत घटनेतील दोघांवरही परस्परविरोधी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही रात्रीपर्यंत सुरू होती.
गोळी झाडणारा व गोळी लागून जखमी झालेला असे दोघेही शहरातील मनपातील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते असल्याचे समजले. मारहाणीतील व गोळीबारातील जखमी दोघांनाही घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने सगळा परिसर सर्द झाला. शहरातही उलटसुलट चर्चा रंगली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलीस आयुक्त सुरेश पवार, सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप बाविस्कर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक बाळू थोरात व अशोक दादाबा औताडे या दोघांमध्ये जमिनीच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद होता. मंगळवारी दुपारी थोरातच्या घरात औताडे याची यावरून बाचाबाची झाली. या वेळी औताडे याने केलेल्या मारहाणीत थोरात जखमी झाला. या दरम्यान दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. थोरातच्या घरापासून काही अंतरावर थोरात याने स्वत:जवळील रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी औताडे याच्या उजव्या पायाला चाटून गेली. त्यात तो जखमी झाला.
हा प्रकार कळताच आसपासचे लोक घटनास्थळी धावले व त्यांनी थोरात-औताडे यांना बाजूला नेले. माहिती मिळताच पोलीसही धावले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. थोरात व औताडे दोघांना घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. थोरात याची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली असली, तरी गोळी झाडल्याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळाली. घटनेतील रिव्हॉल्व्हर परवान्याचे होते काय, तसेच त्याची मालकी कोणाची त्याची माहिती पोलीस घेत आहेत.
भरदुपारी घडले थरारनाटय़
पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या मारामारीचे पर्यवसान जवळील रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या झाडण्यात आले. यातील गोळी लागून एकजण जखमी झाला. औरंगाबादच्या हर्सूल भागातील ऑडीटर सोसायटीत मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे थरारनाटय़ घटले.
First published on: 20-03-2013 at 02:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunfire in aurangabad one injured