लाकूड तस्कर आणि वन कर्मचारी यांच्यात सातपुडय़ातील जंगलात अधूनमधून चकमक होत असली तरी आता हा संघर्ष थेट रस्त्यांवरही सुरू झाला असून मंगळवारी रात्री वन विभागाच्या गस्ती पथकावर शहादा ते धडगाव रस्त्यावर नणंद-भावजय घाटाजवळ काही जणांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गस्ती पथकाच्या जीपचे काही प्रमाणात नुकसान झाले. पथकावर गोळीबार करणारे कोण होते आणि त्यांचा उद्देश काय, हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
सहाय्यक वन संरक्षक साळ विठ्ठल, वनक्षेत्रपाल पी. पी. सूर्यवंशी हे कर्मचाऱ्यांसह दोन वाहनातून मंगळवारी रात्री गस्तीला निघाले असता म्हसावद गावापासून पांढऱ्या रंगाची गाडी (स्कॉर्पिओ क्र. एमएच १९ ए एक्स ९९९८) पुढे जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कधी मंद तर कधी ती गाडी वेग घेत होती. फतेपूर-अमोदा व दऱ्या या गावांजवळ गाडीने वेग कमी केल्यानंतर वन खात्याची वाहने पुढे गेली. स्कॉर्पिओमध्ये पाच ते सहा जण व एक महिला बसलेली वन कर्मचाऱ्यांना आढळले. त्यातील एक जण भ्रमणध्वनीवरून कुणाशी तरी बोलत होता. नंतर स्कॉर्पिओ गस्ती पथकाच्या पुढे निघून गेली. त्यामुळे गस्ती पथकाचा संशय बळावला. काकडदा सोडल्यानंतर नणंद-भावजय घाटाखाली पानबारजवळ तवेरा आणि बोलेरो या दोन गाडय़ा रस्ता अडवून उभ्या होत्या. तिथेच स्कॉर्पिओही उभी होती. काही कळण्याच्या आत टेकडीवर उभ्या असलेल्या लोकांकडून वन खात्याच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. तीन गोळ्या वाहनाच्या समोरील बाजूस लागल्या. जीपच्या पुढील बाजुची काच फुटली. परिस्थिती ओळखून चालकाने जीप मागे वळविण्याचा प्रयत्न केला असता मागील काचेवर दगडांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल वनाधिकाऱ्यांनी गोळीबार केला. दरा फाटय़ाजवळ आल्यावर अधिकाऱ्यांनी वरिष्ठ वनाधिकारी व पोलिसांशी संपर्क साधला असता शहादा, धडगाव व तळोदा येथील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना निकामी काडतुस, क्रिकेटचा स्टम्प व दगड-गोटे आढळून आले.
त्याच रात्री दीडच्या सुमारास धडगाव तालुक्यातील मनखेली फाटय़ाजवळ एक जीप व मोटारसायकल वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली. जीपमध्ये सागवानाचे ३५ ओंडके आढळून आले. याप्रकरणी चौघांना अटकही करण्यात आली. सद्या सातपुडय़ातून लाकडू तस्करीच्या घटनांना वेग आला असून मंगळवारी सकाळी शहादा येथे ४५ हजार रुपये किंमतीचे सागवानी लाकूड जप्त करण्यात आले. सकाळी घडलेल्या या घटनेचा आणि रात्री घडलेल्या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.
नणंद-भावजय घाटात वन विभागाच्या वाहनावर गोळीबार
लाकूड तस्कर आणि वन कर्मचारी यांच्यात सातपुडय़ातील जंगलात अधूनमधून चकमक होत असली तरी आता हा संघर्ष थेट रस्त्यांवरही सुरू झाला असून मंगळवारी रात्री वन विभागाच्या गस्ती पथकावर शहादा ते धडगाव रस्त्यावर नणंद-भावजय घाटाजवळ काही जणांकडून गोळीबार करण्यात आला.
First published on: 21-03-2013 at 02:48 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunfire on forest department van in nanand bhavjay ghat