नववे राज्यस्तरीय गुणीजन साहित्य संमेलन येत्या १० फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले असून या साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष कवी अशोक भांडवलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबादच्या भानुदास चव्हाण सभागृहात आयोजिलेल्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रज्ञा दया पवार राहणार आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे हे संमेलनाचे उद्घाटक आहेत. या वेळी ज्येष्ठ विचारवंत, लेखक अ. कादर मुकादम, बाबा भांड, अॅड. विजय साकोळकर, प्रा. सुभाष भिंगे हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विशेष अतिथी म्हणून सिनेकलावंत स्मिता जयकर व सिने गीतकार आशिष निनगुनकर यांची उपस्थिती राहणार असल्याचे भांडवलकर यांनी सांगितले.
या संमेलनात धोंडिराम माने साहित्य जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांना ज्येष्ठ कवी प्रा. फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. याशिवाय साहित्य पुरस्कार एम. एस. केळे यांच्या ‘ऐसा बाप जागी व्हावा’, लहू कानडे यांच्या ‘तळ ढवळताना’, प्रा. विजय पाथ्रीकर यांच्या ‘यशवंतराव चव्हाण’, प्रा. सुरेश भगत यांच्या ‘धुनी’ या साहित्यकृतींना देण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भांडवलकर यांनी दिली. 

Story img Loader