राज्य शासनाने गुटखा तसेच पानमसाल्यावर बंदी आणली असतानाही त्याची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या ठाणे येथील शिवप्रसाद मोहंतो (५२) या विक्रेत्यास अन्न व औषध प्रशासन विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले. शिवप्रसाद हा घरामध्ये गुटखा तसेच पानमसाल्याचा साठा करून ठेवत होता. तसेच रस्त्यावरील वाहनचालकांना पाच पट दराने विकत होता. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
घोडबंदर येथील भायंदर पाडय़ात शिवप्रसाद याचे गणेश पान विक्रीचे दुकान असून त्यामध्ये गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी दिवाकर कांबळे, शंकर राठोड आणि हर्षां येवले यांच्या पथकाने शनिवारी या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी शिवप्रसाद हा कारचालकांना गुटखा पेपरमध्ये गुंडाळून विकत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. गुटखा तसेच पान मसाला पाकिटांची तो पाचपट दराने विक्री करत होता. तसेच त्याच्या घरामध्ये पाण्याच्या पिंपामध्ये रजनीगंधा सुगंधी मसाला, गोवा गुटख्याची एक हजार पाकिटे, राजा कोल्हापुरी गुटखा, आर.एम.डी. गुटखा आणि विमल गुटख्याची ६२७ पाकिटे असा सुमारे १९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्र. मा. राऊत यांनी दिली.  

Story img Loader