राज्यात प्रसिध्द असलेल्या देऊळगावराजा येथील बालाजी यात्रेत बंदी झुगारून गुटखा विक्रीला उधाण आले आहे. यात्रेतील पान टपऱ्या, चहा टपऱ्या व किराणा दुकानातून राजरोसपणे गुटख्याची विक्री होत आहे. शौकींनाना गुटख्याची कमतरता भासू नये म्हणून ठोक व्यापाऱ्यांनी गुटख्याचा साठा करून ठेवल्याची विश्वसनीय माहिती आहे. शासनाच्या बंदी आदेशाला झुगारून गुटख्याची विक्री होत असतांना देखील अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण होत आहे.
गेल्या काही वर्षांत गुटखा सेवन करणाऱ्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक व महिलांचाही समावेश होता. त्यामुळे शालेय परिसरात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आली होती, परंतु, या बंदी आदेशाला झुगारून सर्रास गुटख्याची विक्री करण्यात येत होती. त्यामुळे गुटखा खाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत होते.
भावी पिढीचे नुकसान होऊ नये, यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोटय़वधी रुपयांच्या महसुलाला ठोकर मारून आरोग्यास घातक ठरणाऱ्या गुटखा साठवणूक व विक्रीला बंदी घातली आहे, परंतु, या बंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अन्न व औषध प्रशासन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. आजही शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची अव्वाच्या सव्वा भावाने विक्री सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून देऊळगावराजा येथे बालाजी यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक व हजारो व्यावसायिक यात्रेत दाखल झाले आहेत. हीच संधी साधून ठोक व्यापाऱ्यांनी योजनाबध्दरीत्या विक्रेत्यांना गुटख्याचा पुरवठा करणे सुरू केले आहे. यात्रेतील पान टपऱ्या, चहा टपऱ्या, किराणा दुकान व इतर दुकानातून सर्रास गुटख्याची विक्री करण्यात येत आहे. गुटखा विक्रेत्यांकडून दस मे लक्स, असा खास  वर्डचा वापर करून ही विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, दहा रुपयांमध्ये गोवा, सितार, विमलच्या तीन पुडय़ा मिळतात.
यात्रेतील पान टपऱ्यांसमोर सर्रास गुटख्याच्या रिकाम्या करण्यात आलेल्या पुडया दिसत असल्याने अनेक भाविक गुटख्याची बिनधास्त मागणी करतांना दिसतात. विक्रेते सुध्दा त्यांना अव्वाच्या सव्वा भावात गुटख्याची विक्री करून तुंबडी भरत आहेत. दिवसाढवळ्या यात्रेत गुटख्याची विक्री होत असतांनादेखील पोलीस, अन्न व औषध प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण होत आहे.

Story img Loader