राज्य सरकारने गुटखाबंदी आदेश जारी केले असले तरी शहर व जिल्हय़ाच्या वेगवेगळय़ा भागांत अनेक ठिकाणी खुलेआम गुटखाविक्री सुरूच आहे. अन्न व औषध भेसळ प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी पहाटे ११ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
राज्य सरकारने राज्यात गुटखाबंदी आदेश जारी केले. गुटखाबंदी असतानाही ठिकठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. आरएमडी, सितार, गोवा या नामांकित कंपन्यांसह अन्य छोटय़ामोठय़ा कंपनीच्या गुटख्यांची सर्रास विक्री होत आहे. आंध्रातून सितार गुटखा मालमोटारीद्वारे परभणीला जाणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नरसी-गडगा रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारीही या वेळी उपस्थित होते. पहाटे पाचच्या सुमारास ही मालमोटार थांबण्याचा आदेश देऊनही पुढे गेल्यानंतर पोलिसांनी पाठलाग केला.
काही अंतरावर ही मालमोटार (डीएन ९ जी९३८४) पोलिसांनी अडवली. त्यात सुमारे ११ लाखांचा सितार कंपनीचा गुटखा होता. पोलिसांनी हा गुटखा व मालमोटार असा सुमारे १५ लाखांचा ऐवज जप्त केला. मालमोटारचालक नारायण माणिक गजरे व मालक युद्धिष्ठ हनुमान जोशी या दोघांना अटक करण्यात आली. फौजदार खंदाडे, पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती तेलंग, हनमंत मदने, महेश माकूरवार, अन्न भेसळ प्रशासनाचे सहआयुक्त के. आर. जयपूरकर, सुरक्षा अधिकारी बी. व्ही. भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेड जिल्हा आंध्र व कर्नाटक सीमेवर आहे. या दोन्ही राज्यांत गुटखाबंदी नाही. परिणामी या दोन्ही राज्यांतून नांदेडच नव्हे, तर मराठवाडय़ातील वेगवेगळय़ा भागांत गुटखा आयात केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.