गुंतागुंतीचे बाळंतपण, तसेच अचूक निदान व उपचाराअभावी ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. हे टाळायचे असेल तर सुरक्षित मातृत्वासाठी समíपत स्त्रीरोगतज्ज्ञांची देशाला आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन महापौर स्मिता खानापुरे यांनी केले.
लातूरच्या पहिल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सरोजिनी देशमुख यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना व देशमुख रुग्णालय यांच्या वतीने काíनव्हल रिसॉर्ट येथे ‘गुंतागुंतीच्या बाळंतपणातील अचूक निदान व उपचार’ या विषयावर मराठवाडा विभागीय स्त्रीरोगतज्ज्ञांची परिषद आयोजित केली होती. परिषदेचे उद्घाटन महापौर खानापुरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील उपस्थित होते. आयएमएचे अध्यक्ष डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अनुजा कुलकर्णी, डॉ. पी. आर. देशमुख यांची उपस्थिती होती.
महापौर खानापुरे म्हणाल्या, की सरोजिनीताईंनी लातूर शहरात कोणतीही अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना समíपत भावनेतून रुग्णांना सेवा दिली. त्यांचा आदर्श घेऊन मराठवाडय़ातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुरक्षित मातृत्वासाठी प्रयत्न करावेत. कॅनडा देशात १ लाख नवजात अर्भकांमध्ये फक्त चार अर्भके मृत्युमुखी पडतात, तर भारतात हेच प्रमाण ४०७ आहे. प्रगत देशांपेक्षा भारतातील नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या परिषदेत विचारमंथन व्हावे, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. अज्ञान व गरिबी यामुळेच ग्रामीण भागात नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ते कमी करायला हवे, असे पाटील म्हणाले.
सरोजिनीताईंची स्मृती कायम स्मरणात राहावी, यासाठी देशमुख कुटुंबीयांच्या वतीने ३ गुणवंत विद्यार्थिनींना दरवर्षी ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रथम मानकरी स्नेहा मोरे, रुद्राणी ढेले, प्रतीक्षा िशदे यांना डॉ. पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. संजय देशमुख, सूत्रसंचालन डॉ. ऋजुता अयाचित यांनी केले. इंद्रजित देशमुख यांनी आभार मानले. ‘अमृतधारा’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेस लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद आदी जिल्हय़ांतील ३०० स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.