गारपीट आणि पावसामुळे शेतकरीवर्ग पुरता आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला तत्काळ भरीव आर्थिक मदत देणे अभिप्रेत असताना शासन पातळीवर दिरंगाई होत असल्याबद्दल तालुक्यातील टेहेरे येथे आयोजित ग्रामसभेत नाराजी उमटली. लोकसभा निवडणुकीपूर्वी मदत प्राप्त न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.
सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत नुकसानीची भीषणता लक्षात घेता शासनाने आपत्कालिन परिस्थिती जाहीर करावी, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीज देयक माफ करावे, नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन त्याप्रमाणे भरपाई द्यावी, या मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट झेलण्याची सवय झाली आहे. संकटावर मात करून तो नेहमीच मार्गक्रमण करत असतो. पण यावेळचे संकट हे नेहमीपेक्षा फारच भयानक असून शेतकरी कमालीचा खचला आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतींचे जे नुकसान झाले त्याचा विचार करता आर्थिकद्दष्टय़ा शेतकरी पाच वर्षे मागे गेले असून त्यांचे भविष्य अंधकारमय झाल्याचे मत यावेळी बहुतांश ग्रामस्थांनी मांडले.
नुकसानीबद्दल शासकीय पातळीवर पंचनाम्याचे काम सुरू असले तरी ठोस भरपाईसंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा होत नसल्याबद्दल सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही भरपाई प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडेल काय, याबद्दलही शंका उपस्थित करण्यात आली. शासकीय पातळीवर तत्काळ निर्णय घेऊन निवडणुकीपूर्वी भरपाईची रक्कम देण्याचा आग्रह धरण्यात आला.
मदत त्वरीत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. नुकसानग्रस्त सर्वच गावांनी असे ठराव करून शासनाकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. सभेस उपसरपंच अनिल शेवाळे, माजी सरपंच अरूण पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.