निसर्गाचा कोप होऊन क्षणात सारे काही उद्ध्वस्त व्हावे, तसे केवळ अध्र्या तासाच्या अवधीत झालेल्या तुफान गारपिटीमुळे साठ लाखहून अधिक कमाई देऊ शकणारी डाळिंबाच्या वीस एकर बागेतील फळे नष्ट झाल्याने तालुक्यातील पिंपळगाव येथील पुंजाराम पवार यांच्या कुटुंबीयांच्या शरीरातील त्राणच निघून गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रकारची आपत्ती कोसळून पाच दिवस उलटले तरी या धक्क्यातून हे कुटुंब अद्याप सावरू शकलेले नाही.
मालेगावपासून १२ किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव हे गाव तसे अत्याधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या परिसराने डाळिंबाच्या उत्पादनात चांगला नावलौकिक मिळवला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या गावातील पुंजाराम पवार यांनी नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. वेगवेगळे प्रयोग शेतात राबविले. त्यांची पत्नी, भाऊ व भावजई असे सर्वचजण पदवीधर असून शेतात ते दिवसभर कष्ट उपसतात. शेतात बांधलेल्या बंगल्यात या कुटुंबाचे वास्तव्य असते. डाळिंबातून गेल्या काही वर्षांत त्यांना चांगली कमाईदेखील झाली. अलीकडे दोन-तीन वर्षांपासून मात्र डाळिंब बागांवर शुक्लकाष्ठ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी तेल्यासारख्या रोगाचे संकट यासारख्या कारणांमुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली.
दोन-तीन वर्षांत खर्चाच्या तुलनेत चांगले उत्पन्न नव्हते. यावेळी चांगले उत्पन्न येण्याची आशा या कुटुंबाला होती. सप्टेंबर महिन्यापासून तयारी केलेली आणि २० एकरवर फुलविलेली डाळिंब बाग यंदा जोमात होती. हा सर्व माल तयार झाल्यावर काढण्यास सुरुवात झाली. त्यासाठी जागेवर १०५ रुपये किलो या दराने डाळिंब व्यापाऱ्याशी सौदा झाला. २० एकर बागेत साधारणत: ६०-७० टनापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते आणि १५ दिवसांत संबंधित व्यापारी हा माल काढून नेणार होता. म्हणजे ६० ते ७० लाखाची कमाई ही बाग देणार हे उघड होते. त्यानुसार गेल्या ७ व ८ मार्च रोजी प्रत्येकी अडीच टन याप्रमाणे पाच टन माल व्यापाऱ्याने तोडूनदेखील नेला. दुसऱ्या दिवशी मात्र हा व्यापारी येण्याच्या आतच ८ मार्च रोजी सायंकाळी पिंपळगाव परिसरात गारपिटीचे तांडव सुरू झाले. जवळपास अर्धा तास गारपीट सुरू होती. पेरू आणि लिंबूच्या आकारातील या गारांच्या तडाख्यात डाळिंबाची फळे फुटून गळून पडली. त्यामुळे जमिनीवर अक्षरश: फुटलेल्या फळांचा थर साचला होता. वादळाने काही झाडे उन्मळून पडली. या तडाख्यात झाडांवर जी काही फळे तग धरून राहिली, ती जबर मार लागल्याने कुजून गेली.
६० लाखाहून अधिक कमाई होऊ शकेल अशी डाळिंबाची बाग केवळ अध्र्या तासाच्या अवधीत होत्याची नव्हती झाल्याने पवार कुटुंबावर मोठीच आपत्ती कोसळली. या बागेवर त्यांनी २२ ते २५ लाखाचा खर्च केला होता. त्यासाठी गावातील सहकारी सोसायटीकडून १८ लाखाचे कर्ज घेतले होते. बागेसोबत तीन एकर कांदाही पूर्णपणे खराब झाला. तसेच दोन महिन्यापूर्वीच आणखी पाच एकरावर त्यांनी नवीन डाळिंबाची लागवड केली होती. ही सर्व रोपेही गारपिटीच्या तडाख्यात नष्ट झाली. या नुकसानीमुळे मोठा अपेक्षाभंग झाल्यामुळे पवार यांचे बंधू राजेंद्र यांनी अंथरूनच धरले आहे. आपल्या उभ्या आयुष्यात निसर्गाचा असा रौद्र अवतार आपण कधी पाहिला नसल्याचे ७५ वर्षीय मधुरबाई पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा