लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या हजरतनिजामुद्दीन एक्स्प्रेसला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला. कल्याण परिसरातील प्रवाशांना यापुढे मुंबई किंवा नाशिकला जाऊन ही गाडी पकडण्याची गरज भासणार नाही.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हजरतनिजामुद्दीन सुपरफास्ट गाडीचे गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मुंबईतून ही गाडी सुटल्यानंतर थेट नाशिक, भुसावळ असे थांबे होते. त्यामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली परिसरातील प्रवाशांना मुंबई किंवा नाशिक येथे जाऊन ही गाडी पकडावी लागत होती. त्यामुळे या गाडीला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी या गाडीला थांबा देण्यात आला, अशी माहिती कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी दिली.